मन की बात (दीपक कुलकर्णी)
मुत्सदी राजकारणी असा बिरुद असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार आज 12 डिसेंबरला वयाच्या 84 वर्षांत पदार्पण करत आहेत. गेल्या 25 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेली वाताहत पाहून शरद पवारांना देखील दु:ख होत असेल, ज्या पुतण्याला बोट धरून राजकारणात आणले त्यानेच या वयात साथ सोडून बंडाचा झेंडा फडकाविला. सत्तेसाठी निष्ठा, प्रेम, नातेसंबंधही कसे दूर सारले जातात हेच त्यातून अधोरेखित झालेले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे एक मुत्सदी राजकारणी म्हणून ख्याती प्राप्त असले तरी त्यांच्या पक्षाची झालेली दाणादाण चिंतन करायला भाग पाडते. शरद पवार हे महाआघाडीचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.
काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष केवळ त्यांच्या राजकीय मुत्सद्दीपणामुळे आजवर महाआघाडीच्या तंबूत एकत्र आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. महाविकास आघाडीला पराभवाचा जबर फटका बसल्यामुळे महाआघाडी आगामी काळात किती काळ तग धरू शकेल हे कोणीच सांगू शकत नाही. काँग्रेस पक्षाची केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशपातळीवर भाजपाने केविलवाणी स्थिती करून टाकली आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस दहा, उद्धव ठाकरेंची शिवसेना वीस आमदारांपर्यंत मर्यादीत झाली आहे. आज दि. 12 डिसेंबरला शरद पवार वयाच्या 84 वर्षांत पदार्पण करीत आहेत. गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी आपण स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कशी वाताहत झाली, हे त्यांना या वयात स्वत: अनुभवावे लागत आहे. आपला पुतण्या अजितदादा यांच्यापासून ज्यांना त्यांनी बोट धरून राजकारणात आणले, ज्यांना सत्तेच्या पदांवर बसून मोठे केले असे अहोरात्र साहेब साहेब म्हणणारे, साहेब हेच आपले दैवत आहेत असे जाहीरपणे सांगणारे, साहेबांच्या आशीर्वादाने दिग्गज नेते झालेले चाळीस-पन्नास जण बंडाचा झेंडा फडकवून त्यांना सोडून गेले, तेव्हापासून नव्याने पक्ष बांधणीचे शिवधनुष्य पुन्हा हाती घेण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे.
ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही प्रादेशिक पक्ष फोडण्यात भाजपाचा पुढाकार होता हे काही लपून राहिलेले नाही. केंद्रातील महाशक्तीची साथ मिळाल्याशिवाय ठाकरे व पवारांना एकाकी पाडणे शक्यही नव्हते. एकनाथ शिंदे व अजितदादांना भाजपाने संरक्षण दिले आणि त्यांना सत्तावाटपात हिस्साही दिला. एवढेच नव्हे तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला व अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाने मान्यताही दिली. एवढे सारे अनुकून होऊनही यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी राज्यात महाआघाडीला कौल दिला व महायुतीला नाकारले. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने सावध झालेल्या भाजपाने पाच महिन्यांत झालेल्या चुका दुरुस्त केल्यात. कल्याणकारी योजना व मोफत रेवड्यांचा मतदारांवर वर्षाव केला. शेवटच्या महिन्यात तर तब्बल एक हजारांवर शासकीय आदेश पारीत करीत नवा विक्रम नोंदविला. एक लाख कोटी निधीची तरतूद कल्याणकारी योजनांवर केली. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राची सत्ता हातून निसटता कामा नये यासाठी भाजपाने चंग बांधला. एकदा राज्याची सत्ता ताब्यात आली की भाजपा सत्ता सोडत नाही. सत्ता व प्रशासन कसे ताब्यात ठेवायचे हे इतरांपेक्षा भाजपाला जास्त कळते. लोकसभेत मिळवलेला विजय महाआघाडीला विधानसभा निवडणुकीत पचवता आला नाही. महाआघाडीला फाजिल आत्मविश्वास नडलाच पण महायुतीने ज्या वेगाने प्रचारात मुसंडी मारली ती गती शेवटपर्यंत महाआघाडील गाठता आली नाही.
जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवला अन् त्याची झळ शरद पवारांनाही बसली. शरद पवारांच्या पुढाकारातूनच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. वर्षभरातच जुलै 2023 मध्ये अजितदादांनी बंडाचा झेंडा हाती घेतला; तेव्हापासून शरद पवारांना पक्ष बांधणीचा पुन्हा श्रीगणेशा करावा लागला. विधानसभा निकालाने पक्षाची वाटचाल अस्ताकडे होऊ लागली काय अशी अवस्था झाली आहे. शरद पवारांनी आपल्या साठ वर्षांच्या सार्वजिक जीवनात अनेक चढ-उतार पाहिले आणि पचवले देखील आहेत. पण आता वयाच्या 84 व्या वर्षी ते पक्षाच्या पुनर्बांधणीची दगदग किती करू शकतील?
विधानसभा निवडणुकीच्या निकालाने पुतण्याने काकांच्या वर्चस्वाला ब्रेक लावला आहे. ज्यांनी साहेबांच्या विरोधात बंड केले, ते सर्व पुन्हा विधानसभेत निवडून आले. फेब्रुवारी-मार्चमध्ये महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अपेक्षित आहेत, त्यामध्ये पवारसाहेबांची पुन्हा कसोटी आहे. स्वत:च्या पक्षाचे आमदार-खासदार यांची एकजूट टिकवणे यासाठी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागेल. इतके दिवस त्यांच्या डाव्या, उजव्या बाजूला अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे असायचे, ते सर्व भाजपाच्या शेजारी जाऊन बसले आहेत. आता सुप्रिया, रोहित पवार यांना बरोबर आपली नवीन टीम उभी करावी लागणार आहे. पक्ष उभारणीसाठी या वयात साहेबांना पुन्हा वणवण करावी लागते आहे! पवार साहेब हे उमदे व्यक्तीमत्व असल्याने ते पुन्हा पायाला फिंगरी बांधून महाराष्ट्र उभा-आडवा पालथा घालतील यात शंका नाही मात्र त्यात त्यांना किती यश येते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. वयाच्या 84 व्या वर्षीही त्यांची काम करण्याची गती तरुण कार्यकर्त्याला देखील लाजवेल अशीच आहे. एकंदरी काय तर सत्तेचा सोपान गाठणे हेच ध्येय आणि ध्यास घेवून त्यांना पहिल्यापासून सुरुवात करावी लागणार हे मात्र निश्चित !
मन की बात
दीपक कुलकर्णी
वरिष्ठ उपसंपादक
मोबाईल नंबर – 9960210311