दादांच्या मंत्र्यांना पाडण्यासाठी साहेबांचा ‘ट्रॅप’!

हिट ठरलेला फॉर्म्युला रिपीट : नाकीनऊ आणण्यासाठी रणनीती

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आता विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटातील मंत्र्यांना पाडण्यासाठी फिल्डींग लावली आहे. अजित पवारांच्या मंत्र्यांविरोधात शरद पवारांनी ट्रॅप लावण्यास सुरुवात केली आहे. लोकसभेत हिट ठरलेला मॅन टू मॅन मार्किंग फॉर्म्युला वापरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आमदारांना नाकीनऊ आणण्याची रणनीती शरद पवारांनी आखली आहे.

अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या आरोपाने तुरुंगात गेलेले राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक अणुशक्तीनगरचे आमदार आहेत. आता ते शेजारच्या शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी इथून तीन वेळा निवडून आले आहेत. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंना अणुशक्तीनगरमधील रॅलीत सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात आले होते. नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक अणुशक्तीनगरमधून लढण्याची तयारी करत आहेत. तिथे पवारांकडून मलिक यांच्या विरोधकांना बळ देण्यात येत आहे. नवाब मलिक ठाकरे सरकारमध्ये मंत्री होते.

अजित पवारांच्या मंत्री, आमदारांना पाडण्यासाठी शरद पवार लावत असलेली फिल्डींग भाजपला महागात पडू लागली आहे. अजित पवारांचे अनेक आमदार, मंत्री 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा पराभव करुन विजयी झाले. आता अजित पवार गटच महायुतीत आल्याने गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भाजपच्या अनेकांना यंदाची निवडणूक लढता येणार नाही. त्यामुळे त्यांची चलबिचल सुरु झाली आहे. आमदारकी लढवण्यासाठी उत्सुक असलेले भाजपचे अनेक नेते पवारांच्या संपर्कात आहेत.

मुंडेंसाठी फासे टाकण्यास सुरुवात

मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात राजासाहेब देशमुखांची महत्त्वाची भूमिका आहे. ते मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. मराठा आरक्षणाचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसला. याच कारणामुळे बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव झाला. आता पंकजा यांचे बंधू धनंजय यांच्या पराभवासाठी शरद पवारांनी फासे टाकण्यास सुरुवात केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.