दिवाळी स्पेशल रेसिपी ! खारे-गोड खुसखुशीत शंकरपाळे

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

काही दिवसांवर दिवाळी (Diwali) आलीय. सर्वीकडे फराळाचा लगभग सुरु आहे. त्यातच खुसखुशीत शंकरपाळे (Shankarpali recipe) सर्वांना आवडतात. चला तर मग जाणून घेऊया  घरी खुसखुशीत खारे आणि गोड शंकरपाळे कसे करायचे..

गोडे शंकरपाळे

साहित्य- 

अर्धा कप दूध, अर्धा कप तूप, ३ पाव कप पिठी साखर, 3 कप मैदा

कृती- 

एका भांड्यात तूप, पिठी साखर आणि दूध घ्यावं. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता भांड्यातील हे मिश्रण गॅसवर ठेवावे. मंद आचेवर, फक्त साखर वितळेपर्यंत गरम करावे.

टीप- या मिश्रणाला उकळी अजिबात येऊ देऊ नये.

तूप, साखर, दुधाचं मिश्रण जेवढं आहे, तेवढंच मैद्याचं पीठ घालायचं. आपण घेतलेल्या मिश्रणानुसार साधारण 3 कप मैदा पुरेल. या पिठाचा गोळा करून घ्यावा. खूप घट्ट किंवा पातळ करू नये. मध्यम प्रमाणात भिजवावा. शंकरपाळ्याचा हा गोळा एक तासभर झाकून ठेवावा. तासाभरानंतर पोळीसाठी जसा घेतो, तसा गोळा घेऊन पोळपाटावर लाटून घ्यावा.

टीप– पोळीच्या कणकीसारखा हा गोळा एकजीव होत नाही. पोळी लाटताना या गोळ्याला बाहेरून भेगा पडलेल्या दिसतात. हे नॉर्मल आहे.

आपल्याला हव्या तशा शंकरपाळ्या जाड किंवा पातळ लाटून घ्याव्यात. छान आकारात हव्या असतील तर या पोळीच्या आधी कडा काढून घ्याव्यात. त्यानंतर आडवे-उभे-तिरपे काप देऊन शंकरपाळे करावेत.

टीप– सगळे शंकरपाळे बनवेपर्यंत कापलेले शंकरपाळे एका ताटाखाली झाकून ठेवावेत.

कढईत तेल किंवा तूप मध्यम आचेवर गरम करून घ्यावे. तेल खूप कडकडीत गरम करू नये. मध्यम आचेवर शंकरपाळे तळून घ्यावेत. सगळ्या बाजूने तांबूस रंग येईपर्यंत हलवत रहावे. तांबूस रंग आल्यानंतर कढईतून बाजूला काढून टिश्यू पेपरवर काढून घ्यावेत. हे शंकरपाळे दोन ते तीन आठवडे चांगले राहतात.

जिरा शंकरपाळे

साहित्य- 

1 कप मैदा,1 मोठा चमचा जिरं, चवीपुरतं मीठ

कृती- 

मैदा, जिरे आणि मीठ एका ताटात व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. या मिश्रणात एक मोठा चमचा तेल घालावं. थंड किंवा गरम दोन्ही घातलं तरी चालतं. तेल मैद्यात छान झिरपल्यानंतर थोड-थोडं पाणी घालून गोळा भिजवून घ्यावा. एका बाऊलमध्ये हा गोळा साधारण अर्धा तास झाकून ठेवावा. शंकरपाळे लाटताना एकदा हा गोळा पुन्हा छानसा मळून घ्यावा. शंकरपाळ्यासाठी शक्य तेवढी पातळ पोळी लाटून घ्यावी. कटरच्या सहाय्याने हव्या त्या आकारात किंवा डायमंड आकारात हे शंकरपाळे कापून घ्यायचे. सगळे शंकरपाळे लाटून, कापून होईपर्यंत एका ताटात हे झाकून ठेवावेत. कढईत तेल गरम झाल्यावर झाऱ्यावर काही शंकरपाळे घेऊन ते तेलात सोडावेत. पुऱ्यांसारखे हे शंकरपाळे फुगतात. मध्यम आचेवर दोन्ही बाजूने तळून घ्यावेत. सोनेरी रंग आल्यावर शंकरपाळे टिश्यू पेपरवर काढून घ्यावेत.

Leave A Reply

Your email address will not be published.