‘हयुमन कॉम्प्युटर’ म्हणून ओळख असलेल्या भारतीय गणिती : ‘शकुंतला देवी’

0

लोकशाही विशेष लेख

गणित विषयाची आवड खूप कमी लोकांना असते. अनेक जणांच्या मते शाळेत शिकलेल्या गणिताचा व्यावहारिक जीवनात कधी वापरच केला जात नाही. मात्र, अशीही लोक आहेत ज्यांनी संपूर्ण आयुष्य गणितासाठी वाहिले. यापैकीच एक होत्या शकुंतला देवी (Shakuntala Devi). ४ नोव्हेंबर १९२९ ला बंगलोरमध्ये शकुंतला देवी यांचा जन्म झाला. त्यांच कुटुंब म्हणजे पारंपारिक कन्नड ब्राम्हण. वयाच्या ६व्या वर्षी शकुंतलादेवी यांनी म्हैसुर विद्यापीठात आपल्या अंकगणितीय कौशल्याचे प्रदर्शन केले. एक गणितज्ज्ञ, ज्योतिषी, लेखिका, बासरी वादक अशा अनेक कला विलक्षण प्रतिभा असलेल्या व्यक्तीतच असू शकतात.

शकुंतला या तीन वर्षे वयाच्या असतानाच एकदा पत्ते खेळत होत्या. त्यावेळीच गणितातील त्यांची विलक्षण प्रतिभा त्यांच्या वडिलांनी हेरली होती. शकुंतला या चार वर्षांच्या असतानाच म्हैसूर विद्यापीठाच्या (University of Mysore) एका मोठ्या गणिताच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. भारतासह जगभरात त्यांच्या गणितीय ज्ञानाबद्दल माहिती होण्याचं हे पहिलं पाऊल होतं. वयानं लहान असतानाही शकुंतला ज्या वेगानं अंक लक्षात ठेवत असत, ते पाहून त्यांचे वडील आश्चर्यचकित होत असत. पाच वर्षांच्या झाल्यानंतर त्यांनी गणितातील प्रश्नही सहज सोडवण्यास सुरुवात केली. गणितातले प्रश्न सोडवण्यासाठी शेजारची मुलंही शकुंतला यांच्याकडेच येत. हळूहळू गणितातील त्यांची कुशलता सर्वत्र पसरू लागली. वयाच्या ६व्या वर्षी शकुंतलादेवी यांनी म्हैसुर विद्यापीठात आपल्या अंकगणितीय कौशल्याचे प्रदर्शन केले.

१९७७ मध्ये डलास विद्यापीठात शकुंतला देवी यांचा मुकाबला तत्कालीन सर्वात जलद कॉम्प्युटर ‘युनिव्हॅक’ शी झाला. तेथे शकुंतला देवीने २०१ अंकी संख्येचे २३वे मुळ ५० सेकंदात काढले. हे मुळ काढायला संगणकाला ६२ सेकंद लागले. १८ जून १९८० मध्ये त्यांना ७६८६३६९७७४८७० आणि २४६५०९९७४५७७९ या दोन संख्या गुणाकारासाठी देण्यात आल्या. हे आकडे लंडनच्या इम्पीरिअल कॉलेजच्या संगणक विभागाने निवडले होते. शकुंतला देवी यांनी या दोन आकडयांचा अचूक गुणाकार करून दाखवत केवळ २८ सेकंदामध्ये १८९४७६६८१७७९८४४२६४६२७७३७३० हे उत्तर दिले. १३ आकडी दोन संख्यांचा गुणाकार त्यांनी फक्त २८ सेकंदात पूर्ण केला. त्यांच्या याच कामगिरी मुळे त्यांना ‘हयुमन कॉम्प्युटर’ (The Human Computer) म्हणून ओळखले जाऊ लागले. २०१३ सालच्या एप्रिल महिन्यात वयाच्या ८३ व्या वर्षी बंगलोरमध्ये शकुंतला देवी यांनी अखेरचा श्वास घेतला आणि हा जगप्रसिद्ध ह्युमन कॉम्प्युटर काळाच्या पडदयाआड झाला.

कु. गायत्री अशोक शिंदे
केसीई बी.एड. कॉलेज, जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.