साने-पाली ग्रामपंचायतमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा

0

शहापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

येथील साने-पाली ग्रुप ग्रामपंचायत मध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी .अर्जदार रोहन दत्तात्रय तरणे यांनी केली असून अन्यथा उपोषण करण्याचा इशारा दिला आहेशहापूर तालुक्यातील वासिंद जवळील मौजे साने-पाली ग्रुप ग्रामपंचायती मध्ये झालेल्या  गैरव्यवहाराबाबत कै.

हरिश्चंद्र काळूराम तरणे यांनी मार्च 2018 व जून 2019 या कालावधीत शहापूर गटविकास अधिकारी यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे जिल्हा परिषद व कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या अनुषंगाने पाठपुरावा घेत असतांना दुर्दैवाने हरिश्चंद्र तरणे यांचे निधन झाले.

परंतु त्यांच्या तक्रार अर्जावर चौकशी अंती ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच कल्पना वाघे, उपसरपंच काजल तरणे, सदस्य अनंता पाटील, वैशाली पाटील, प्रसाद वाघे अन्य सदस्य आणि तत्कालीन ग्रामसेवक गजानन कुटेमाटे व इतर कर्मचारी यांच्याकडून अनधिकृत बांधकामांना परवानगी देणे, 15 टक्के मागासवर्गीयांसाठी करावयाचा खर्च यासाठी निविदा न मागविता सदर खर्च करणे,10 टक्के महिला बालकल्याण खर्च रोखीने करणे आदींबाबत तसेच  महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहीता 2011 चे उल्लंघन करणे, खाजगी जमिनीवर घर बांधणीसाठी परवानगी / ना हरकत दाखला देणे याबाबत अनियमितता झाल्याचे सिद्ध झाले आहे.

त्यामुळे 04 जानेवारी 2017 च्या शासन आदेशात दिलेल्या निर्देशाप्रमाणे संबंधित दोषींवर फौजदारी कारवाई व्हावी, असे आदेश दिनांक 05 ऑक्टोबर 2021 रोजी कोकण विभागीय आयुक्त यांनी ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केले आहेत. तसेच याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे यांनी दिनांक 02 नोव्हेंबर 2021 रोजी शहापूर गटविकास अधिकारी यांना 04 जानेवारी 2017 च्या शासन आदेशात दिलेल्या निर्देशाप्रमाणे संबंधित दोषींवर तातडीने फौजदारी कारवाई  करण्याचे आदेश पारीत केले आहेत.

मात्र  साडेचार महिन्यांपूर्वीच हे आदेश पारीत होऊनही आजतागायत शहापूर गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी कारवाई केलेली नाही.  त्यामुळे कै. हरिश्चंद्र तरणे यांचे पुतणे रोहन तरणे यांनी शहापूर गटविकास अधिकारी यांच्याकडे  संबंधित दोषींवर तात्काळ फौजदारी कारवाई करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली असून अन्यथा ‘आमरण उपोषण करण्याचा इशाराही’ रोहन तरणे यांनी त्याद्वारे केला आहे.

संबंधित अधिकारी वर्गाने सदर प्रकरण जाणूनबुजून दाबून ठेवलेले असतांना या प्रकरणी रोहन तरणे यांनी सबंधित माहिती मागवून हे प्रकरण उघडकीस आले आहे. तसेच गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी  कारवाई करण्यात विलंब केल्याने दप्तर दिरंगाई कायद्यानुसार संबंधित गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी रोहन तरणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे यांच्याकडे  लेखी तक्रार दाखल केली आहे.यासंदर्भात शहापूर गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांच्या शी संपर्क साधला असता मिटींगमध्ये व्यस्त असल्याचे त्यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.