शहापूर, लोकशाही न्युज नेटवर्क
शहरातील एका खासगी शाळेत मुलींच्या स्वच्छतागृहात रक्ताचे डाग आणि पॅड आढळल्याने संतापलेल्या मुख्याध्यापिकेने पाळी आलेल्या विद्यार्थिनीला शोधण्यासाठी प्रत्येक विद्यार्थिनीला आपले अंतर्वस्त्रे काढून तपासणी केली. या घृणास्पद कृत्याबद्दल पोलिसांनी बुधवारी मुख्याध्यापिकेसह चार शिक्षिका, महिला सफाई कामगार आणि दोन संस्था चालकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुख्याध्यापिका आणि सफाई कामगार महिलेलाही अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या महिला सफाई कामगारने मंगळवारी दुपारी स्वच्छतागृहात रक्ताचे डाग आणि भिंतीवर रक्ताने माखलेल्या बोटांचे ठसे पाहिले आणि तिने हा प्रकार मुख्याध्यापिकेच्या निदर्शनास आणला. त्यानंतर मुख्याध्यापिकेने पाचवी ते दहावीतील सर्व विद्यार्थिनींना बोलावून कोणाला पाळी आली आहे का? असे ओरडुन विचारले. मात्र सर्व विद्यार्थिनी भीतीने गप्प बसल्या. त्यावर मुख्याध्यापिकेने पुन्हा संतापून विचारल्याने काही विद्यार्थिनींनी घाबरून पाळी आल्याचे सांगितले. परंतु त्यांच्यावर विश्वास न ठेवता मुख्याध्यापिकेने सफाई कामगार महिलेस सर्व विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे काढून तपासणी करण्यास सांगितले. तसेच भिंतीवरील रक्ताच्या डागाची चित्रफीतही प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थिनींना दाखवली. शिवाय काही विद्यार्थिनींच्या बोटांचे ठसे घेतल्याचा आरोप तक्रारीत दाखल करण्यात आला आहे.
मुख्याध्यापिकेने केलेल्या घृणास्पद प्रकाराबद्दल काही विद्यार्थिनींनी पालकांना सांगितले. बुधवारी सकाळी पालकांनी शाळेत धाव घेतली. पालकांनी मुख्याध्यापिकेला जाब विचारला. संस्थाचालक येईपर्यंत पालकांनी शाळेतच ठिय्या मांडला. पालक मुख्याध्यापिकेविरोधात प्रचंड संताप व्यक्त करीत असतानाच तेथे पोलिस पोहोचले आणि त्यांनी तातडीने मुख्याध्यापिकेला पोलिस ठाण्यात आणले.
त्यानंतर पोलिसांनी मुख्याध्यापिकेस पोलिस ठाण्यात नेले. संतप्त पालकांनी आपला मोर्चा पोलिस ठाण्याकडे वळवला. जोपर्यंत संस्थाचालक शहापूरला येत नाही आणि मुख्याध्यापिकेवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, असे म्हणत पालकांनी घोषणाबाजी सुरू केली आणि पोलिस ठाण्यासमोर ठाण मांडले. या प्रकाराबद्दल दोन संस्थाचालक, मुख्याध्यापिका, चार शिक्षिका आणि सफाई कामगार महिलेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे उपपोलिस अधीक्षक मिलिंद शिंदे यांनी सांगितले. दरम्यान मुख्याध्यापिकेला बडतर्फ करणार असल्याची माहिती संस्थेने पालकांना दिली.