लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रातील जनतेला सध्या भीषण इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे. परभणी, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक झळकले असून, ज्या काही मोजक्या पंपांवर इंधन शिल्लक आहे, तिथे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, इंधन दरवाढीविरोधात पुण्यात आक्रमक पवित्र्यात असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा एकदा इंधन टंचाईचे सावट गडद झाले आहे. मुख्य डेपोकडून इंधनाचा पुरवठा वेळेत न झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधन संपले आहे. त्यामुळे चालकांना ‘नो स्टॉक’चे फलक पाहावे लागत आहेत. ज्या पंपांवर इंधन उपलब्ध आहे, तिथे वाहनांच्या किलोमीटर लांब रांगा लागल्या असून तासनतास ताटकळत राहावे लागत आहे. पुरवठ्यातील विस्कळीतपणामुळे परभणीतील अनेक पंप चालकांवर पंप पूर्णपणे बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. जिल्ह्यातील एकूण 165 पेट्रोल पंपांपैकी निम्म्याहून अधिक पंप गेल्या तीन दिवसांपासून इंधन नसल्यामुळे कुलूपबंद आहेत. सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांगरा येथील पेट्रोल पंपावर काल रात्री इंधन भरण्यासाठी आलेल्या एका इसमाला काही दुचाकीस्वार गुंडांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे, यावेळी घटनास्थळी पोलीस कर्मचारी हजर असतानाही हा राडा झाला.
वाशिम जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. डिझेल मिळवण्याच्या कारणावरुन ग्राहकांची तुंबळ हाणामारी झाल्याची घटना वाशिमच्या छाबडा पेट्रोल पंपावर घडली आहे. वाशिम मध्ये गेल्या तीन दिवसापासून डिझेलचा तुकडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे, अशातच आज दुपारच्या दरम्यान वाशीमच्या छाबडा पेट्रोल पंपावर डिझेल टँकर आल्यानंतर ग्राहकांनी मोठी गर्दी केली. मात्र, लागलेल्या रांगेवरून ग्राहकांमध्ये किरकोळ शाब्दिक वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. काही काळ पेट्रोल पंपावर तनावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पेट्रोल पपंचालकांनी 112 वर फोन करून ही कोणताच फायदा न मिळाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, अनेक पंपांवर आधी अचानक ‘डिझेल नाही’चे फलक लावले गेले आणि दरवाढ लागू होताच अवघ्या काही वेळात डिझेलची विक्री पुन्हा सुरू झाली. यामुळे ग्राहकांची फसवणूक करून आर्थिक फायदा उचलण्यासाठी ही ‘कृत्रिम टंचाई’ निर्माण केली गेली का? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे. पद्मभूषण अण्णा हजारे राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर चौधरी यांनी या संपूर्ण प्रकरणाची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून दोषी पंपांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
एकीकडे राज्यात इंधनाचा तुटवडा असताना, दुसरीकडे पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात मनसे पुण्यात आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर येत असून त्यांच्यासमोरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला होता. मात्र, पुणे पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. पुणे पोलिसांनी शहरात पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास बंदी घालत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. तसेच, पुणे पोलिसांनी मनसे शहरप्रमुख साईनाथ बाबर यांना नोटीस बजावून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आंदोलन करू नये, असे म्हटले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची स्थिती निर्माण झाली असून काही पेट्रोल पंपांवर इंधनासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. डिझेलची मागणी वाढल्याने पुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे. गुजरातमधील वाहनचालकही नंदुरबारमध्ये इंधन भरण्यासाठी येत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. पेट्रोल कंपन्यांकडून पुरेसा पुरवठा होत नसल्याची माहिती समोर येत असून इंधन उपलब्धतेबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.


