लोकशाही न्यूज नेटवर्क
पावसाळा सुरु झाल्यापासून सतत पाऊस सुरु होता. दरम्यान पावासने काहीशी उसंत घेतली मात्र यंदा पिकांना आवश्यक प्रमाणात ऊन मिळत नसल्यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. अश्यात आता ढगाळ वातावरण कायम असल्यानेआणि वातावरणात होत असलेल्या बदलाने कपाशी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे पिक घेतले जाते. मात्र मागील दोन- तीन वर्षापासून सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये शेतकऱ्यांना घट येत असून उत्पादन खर्च अधिक होत आहे. शिवाय हमी भावापेक्षा सुद्धा कमी दर मिळतं असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी कपाशी पिकाकडे वळले आहेत. यंदाच्या खरिपात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुमारे २४ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी पिकांची लागवड केली आहे.
मात्र, मागील पंधरा दिवसापासून ढगाळ वातावरण व सततचा पाऊस या बदलत्या वातावरणामुळं कपाशी पीकांवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. फुलं, पाते गळून जात असून पानं लाल पडतं असल्याने कपाशी पिकं धोक्यात आली आहेत. कपाशीवर हा रोग वाढत असल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. शिवाय कपाशीच्या उत्पन्नावर देखील परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.