लोकशाही न्यूज नेटवर्क

बांद्रा (पश्चिम) येथील शेर्ली राजन रोडवरील ‘अटलांटिक’ इमारतीच्या सातव्या मजल्यावर बुधवारी रात्री भीषण आग लागली. या दुर्घटनेत एका ६४ वर्षीय रहिवाशाचा मृत्यू झाला असून, आग विझवताना दोन अग्निशमन जवान जखमी झाले आहेत. सुमारे अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आले.
मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ९.१२ च्या सुमारास आगीची माहिती मिळाली. आगीचे गांभीर्य लक्षात घेऊन रात्री ९.५५ वाजता ही लेव्हल-१ ची आग असल्याचे घोषित करण्यात आले. अग्निशमन दल, मुंबई पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा, अदानी इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारी आणि पालिका अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संयुक्तरीत्या बचावकार्य सुरू केले. रात्री ११.५० वाजता ही आग पूर्णपणे आटोक्यात आली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून, संबंधित यंत्रणांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
ही आग तळमजला अधिक सात मजल्यांच्या इमारतीमधील सातव्या मजल्यावरील रूम नंबर ७०१ आणि ७०२ मध्ये लागली होती. आगीत घरातील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन आणि इतर घरगुती साहित्य जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच काही रहिवासी वरच्या मजल्यांवर अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती, त्यामुळे अग्निशमन दलाने तात्काळ शोध आणि बचाव मोहीम राबवली.
बचावकार्यादरम्यान अझीम बारोडावाला (६४) यांना इमारतीमधून बाहेर काढून तातडीने भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, असे डॉक्टरांनी घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आग विझवण्याच्या मोहिमेदरम्यान बांद्रा अग्निशमन केंद्राचे शिवशंकर भारत पुरी (३२) आणि नवनाथ मोहन बिटे (३४) हे दोन जवान धुरामुळे गुदमरल्याने जखमी झाले. त्यांना तातडीने भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीच्या ज्वाळा काही वेळातच सातव्या मजल्यावर वेगाने पसरल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. आजूबाजूच्या उंच इमारतींमधूनही आगीचे लोळ स्पष्ट दिसत होते. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग इतर मजल्यांवर पसरण्यापासून रोखली.


