भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

महायुतीचा घटक असतानाही भाजपा आणि शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक पातळीवर सावत्रपणाची वागणूक मिळत असल्याचा नाराजीचा सूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्हा आढावा बैठकीत उमटला. निवडणुकीच्या काळात महायुतीच्या नावाखाली सोबत घेतले जाते; मात्र शासकीय कार्यक्रम, बैठका तसेच विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना डावलले जात असल्याची तक्रार कार्यकर्त्यांनी केली.
भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात शनिवार, २९ रोजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी जिल्ह्याच्या पूर्व भागातील विविध विधानसभा मतदारसंघांत भाजपा-शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी अपेक्षित समन्वय साधला जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
महायुती सरकारच्या निधीतून मंजूर झालेल्या विकासकामांच्या कार्यक्रमांमध्येही राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना निमंत्रण दिले जात नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. हा प्रकार थांबवून महायुतीचा धर्म पाळत राष्ट्रवादीला योग्य मानसन्मान व स्थानिक पातळीवर समन्वय मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
वरिष्ठांची भेट घेणार
बैठकीतील नाराजीची दखल घेत राष्ट्रवादीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे शिष्टमंडळ लवकरच पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेणार आहे. स्थानिक पातळीवरील परिस्थिती दोन्ही नेत्यांसमोर मांडून त्यावर तोडगा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक तयारीचाही आढावा घेण्यात आला. गट व गणनिहाय तयारी, बूथस्तरावरील संघटन मजबूत करणे आणि मतदार याद्यांची पडताळणी करण्यावर भर देण्यात आला.
एसआयआर प्रक्रियेत नव्याने जाहीर होणाऱ्या मतदार याद्यांची बूथस्तरावर तपासणी करून नावे नसलेल्या तसेच अनोळखी नावांबाबत तक्रारी दाखल करण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदांसाठी पक्षाच्या इच्छुकांचे अर्ज भरून यादी तयार करण्याचे ठरले. जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सूचना आणि अडचणी ऐकून घेतल्या. पक्षाच्या संघटनात्मक अडचणी प्रदेश पातळीवर मांडून त्यावर सकारात्मक निर्णयासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
बैठकीस सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, ज्येष्ठ नेते भगतसिंग पाटील, रावेरचे उपनगराध्यक्ष असिफ दारा शेख, जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे, ओबीसी जिल्हाध्यक्ष डॉ. सोपान दुट्टे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष कुरबान शेख यांच्यासह विविध तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


