थेट घरातून गांजा विक्री; दोन महिलांना अटक

१ लाख २८ हजार रुपयांचा गांजा जप्त

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

एमडी ड्रग्स आढळून आल्याने सांगलीच्या विटा येथे याची मोठी साखळी असल्याचे बोलले जात आहे. याचा अद्याप तपास सुरु असताना विटा येथील साळशिगे आणि मायणी परिसरात तयार उग्र वासाचा गांजा आढळून आला आहे. हा गांजा विक्री करत असणाऱ्या दोन महिला विटा पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार विटा पोलीस हद्दीमध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये पोलिसांकडून पेट्रोलिंग करुन कारवाई सुरू होती. यामध्ये गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अंमलदार यांना विटा पोलीस ठाणे हददीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना संभाजी सोनवणे यांना साळशिंगे गावच्या हद्दीत वनवासवाडी रोड येथे एका घराजवळ एक महिला गांजा विकत असल्याची टीप मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार पथकाने छापा टाकला असता एक महिला तिच्या घरातील सोफ्यामध्ये गांजा ठेवून त्याची विक्री करताना रंगेहाथ सापडली. त्या छाप्यात सापडलेल्या महिला आरोपी हुसेनबी गुलाब शेख हिला ताब्यात घेवुन तिच्या ताब्यातील पिशवीची झडती घेतली. त्या पिशवीमध्ये उग्र वासाचा तयार गांजा सापडला. पोलिसांनी गांजा कोठून आणला? याबाबत कसून चौकशी केली असता तिने हा गांजा मायणी येथील शोभा बाळकृष्ण चिवटे हिच्याकडून घेतला असल्याचे सांगितले.

त्यानंतर पथकाने मायणी येथे जावुन त्या महिलेच्या घराची झडती घेतली असता तिथे उग्र वासाचा गांजा मिळुन आला. या गांजा विक्रीप्रकरणी हुसेनबी गुलाब शेख आणि शोभा बाळकृष्ण चिवटे या दोन्ही महिलांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत १२ किलो ८५६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या जप्त केलेल्या गांज्याची किंमत १ लाख २८ हजार ५६० रुपये इतकी आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.