कोथळीच्या सागर चौधरीची इस्रोमध्ये भरारी

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील कोथळी येथील सागर ज्ञानदेव चौधरी या सर्वसामान्य कुटुंबातील युवकाने गरुड झेप घेत अक्षरशः इस्रोमध्ये भरारी घेत शास्त्रज्ञ म्हणून नियुक्तीचे पत्र प्राप्त झाल्याने केवळ मुक्ताईनगर तालुक्यातच नव्हे जिल्ह्यातील अद्वितीय अशी ही निवड असल्याने त्याचे विविध स्तरावरून कौतुक केले जात आहे. अभिमानाचा विषय म्हणजे शास्त्रज्ञाची नियुक्ती देताना ग्रुप ए गॅझेटेड ऑफिसर म्हणून ही निवड झाली आहे.

सागर याचे वडील ज्ञानेश्वर रामू चौधरी हे अंतुर्ली येथील एम आर महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये कनिष्ठ प्राध्यापक होते, तर आई सुनिता चौधरी या सर्वसामान्य गृहिणी आहेत. सागर याचे प्राथमिक शिक्षण अंतुरली, आठवी ते बारावी केंद्रीय अभ्यासक्रमानुसार मायक्रोविजन बऱ्हाणपूर तर पुणे येथे बी ई मेकॅनिकल मध्ये पुणे विद्यापीठात सागर हा टॉपर आलेला होता.एवढेच नव्हे तर त्याने एम टेक मध्ये देखील सरदार वल्लभाई पटेल नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सुरत येथे थर्मल विषयात गोल्ड मेडल मिळालं आहे.

विद्यमान काळात सागर पवई -मुंबई येथील आय आय टी मध्ये पीएचडी करत होता. त्याच दरम्यान त्याची ही नियुक्ती झाली आहे. संदीप फाउंडेशन नाशिक येथे प्राध्यापक म्हणून देखील त्याने काम केले आहे.

सागर याचे आधीपासूनच थर्मल क्षेत्रात उच्च शिक्षण करण्याचे ध्येय होते. त्यातच देशसेवेची आवड असल्याने इस्रो सारख्या सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रात काम करण्यास मिळाले तर सामान्य शेतकऱ्यांसाठी हवामानावर आधारित विविध शोध लावण्यात त्याला रस आहे. तो छंद जोपासता येईल अशी भूमिका तो मांडतो.

परदेशात लाखो रुपये महिन्याची मिळालेली नोकरी सोडून केवळ देशसेवेचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून भविष्यात “मी बनवलेला (शोध लावलेला) एखादा घटक” हा अवकाशात जावा हीच त्याची धडपड आहे. 2019 मध्ये इस्रोची जाहिरात निघाली होती. 2020 मध्ये परीक्षा 2021 मध्ये मुलाखत आणि 2022 मध्ये सागरची नियुक्ती गॅझेटेड ऑफिसर म्हणून शास्त्रज्ञ पदी झाल्याने केवळ मुक्ताईनगर तालुक्यासाठी नव्हे तर जिल्ह्यासाठी तो एक बहु मानाचा मुकुट आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.