लोकशाही न्यूज नेटवर्क

सोयगाव सह परिसरात आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीपूर्व तयारीला वेग दिला आहे. मिरची व कापूस लागवडीसाठी मशागतीची कामे सुरू असतानाच घरगुती साठवणीत ठेवलेल्या सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता तपासण्यावर भर दिला जात आहे. पावसाळ्यापूर्वीच बियाण्याची गुणवत्ता पडताळून उत्पादनात नुकसान टाळण्यासाठी शेतकरी विविध पारंपरिक तसेच वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करत आहेत. सोयगाव तालुक्यातील तसेच परिसरातील गावांमध्ये शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज होत आहेत. यंदा पावसाळा वेळेत होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व नियोजनाला सुरुवात केली आहे. विशेषतः सोयाबीन पिकासाठी घरातील साठवणीत असलेल्या बियाणांची उगवण क्षमता तपासली जात असून, त्यानुसार पेरणीचे नियोजन केले जात आहे.
उगवण क्षमता तपासण्यासाठी काही शेतकरी ओल्या गोणपाटावर शंभर दाणे ठेवून त्यांची रुजवण करत आहेत. तर काही जण वर्तमानपत्र, टिशू पेपर किंवा कापडाचा वापर करून उगवण तपासत आहेत. काही शेतकरी सावलीच्या ठिकाणी मातीमध्ये तीन ते पाच सेंटीमीटर खोलीवर दाणे पेरून प्रत्यक्ष उगवण प्रक्रिया पाहत आहेत.
चांगल्या प्रतीचे आणि उगवण क्षमता अधिक असलेले बियाणे वापरल्यास शेतात रोपांची संख्या संतुलित राहते. त्यामुळे पिकाची वाढ एकसमान होते आणि उत्पादन वाढण्यास मदत मिळते. यंदा पावसाळा समाधानकारक झाल्यास सोयाबीन उत्पादनात वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान, बीजप्रक्रियेमुळे सुरुवातीच्या अवस्थेत होणारे बुरशीजन्य रोग कमी होतात. रोपांची वाढ चांगली होते. त्यामुळे शेतकरी आता उगवण चाचणीसोबत बीजप्रक्रियेलाही महत्त्व देत आहेत. सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास पेरणीवेळी बियाण्याचे प्रमाण वाढवावे लागते. कारण कमी उगवण झाल्यास शेतात रोपांची संख्या घटते आणि उत्पादनावर परिणाम होतो. काही वेळा ६० टक्के उगवण क्षमता असलेले बियाणेही वापरले जाते; मात्र त्यासाठी अतिरिक्त बियाणे टाकावे लागते. उगवण खूपच कमी असल्यास नवीन बियाणे खरेदी करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून दिला जात आहे. दरम्यान, पिकाची सुरुवातीपासूनच योग्य वाढ होण्यास मदत मिळत आहे. ७० टक्क्यांपेक्षा अधिक उगवण क्षमता योग्य असते.
उगवण क्षमता तपासण्यासाठी शेतकरी शंभर दाणे निवडून ओल्या गोणपाटावर, वर्तमानपत्रावर किंवा टिशू पेपरवर ठेवतात. त्यांना आवश्यक ओलावा देऊन काही दिवस झाकून ठेवले जाते. काही शेतकरी मातीमध्ये दाणे पेरून प्रत्यक्ष उगवण तपासतात. सात ते आठ दिवसांनंतर किती दाणे रुजले याची मोजणी करून उगवण क्षमता निश्चित केली जाते. यावरून बियाणे पेरणीस योग्य आहे की नाही, हे ठरवले जाते. तपासणीमुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो खरीप हंगामात पेरणी झाल्यानंतर जर उगवण कमी झाली तर आर्थिक फटका बसतो. त्यामुळे शेतकरी बियाण्याची उगवण क्षमता तपासणी करत आहेत.


