लोकशाही विशेष लेख
अर्थशास्त्राच्या उपभोग, उत्पादन, विनिमय व वितरण या विभागात सूक्ष्म विश्लेषण पद्धतीचा उपयोग करण्यात आला आहे. उपभोग: सूक्ष्म विश्लेषण पद्धतीच्या आधारेच घटत्या सीमांत उपयोगीतेचा नियम, उपभोक्त्यांचे संतोषाधिक्य व समसीमांत उपयोगिता नियम इत्यादींचा अभ्यास केला जातो. उत्पादन: विशिष्ट उद्योगातील उत्पादन परिमाण, त्यांचे उत्पादन खर्च इत्यादी गोष्टींचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्राच्या साहाय्याने करण्यात येतो. विनिमय: विशिष्ट वस्तूची व सेवेचे किंमत निरनिराळ्या परिस्थितीत कशाप्रकारे निश्चित होते याचे विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्र करते. वितरण: उत्पादन क्रियेत भाग घेणाऱ्या निरनिराळ्या उत्पादक घटकांमध्ये उत्पादनाची वाटणी कशा प्रकारे होते याचा विचार सूक्ष्म अर्थशास्त्रात होती.
स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती (Scope of Macro Economics)
व्याप्तीच्या दृष्टीने सुद्धा सुक्ष्म अर्थशास्त्र व समग्र अर्थशास्त्र यात मुलभूत फरक आहे. सुक्ष्म अर्थशास्त्रात एका घटकाचा एका व्यक्तीच्या उत्पन्न, उपभोग, राहणीमान, बचत, गुंतवणूक पातळीचा तसेच एका वस्तूचे उत्पादन किंमत इ. विचार व अभ्यास केला जातो तर समग्र लक्षी अर्थशास्त्रात देशाचे एकूण उत्पादन, उत्पन्न, बचत गुंतवणूक किंमत एकूण राजकोषीय धोरण, मौद्रीक धोरण, अंतरराष्ट्रीय व्यापार इ. चा व्यापक स्वरुपात अभ्यास केला जातो. अशा समग्र अर्थशास्त्राची व्याप्ती पुढील पद्धतीने अधिक स्पष्ट करता येईल.
१. उत्पन्न व रोजगार सिद्धांत:
समग्रलक्षी अर्थशास्त्रात देशातील उत्पन्न पातळी व रोजगार पातळीचा अभ्यास करतांनी ती कशावर अवलंबून असते व तीच्या मध्ये कशामूळे बदल होतात याचा विचार केला जातो. या शिवाय उपभोग, गुंतवणूक फलन यांचा ही अभ्यास केला जातो. तसेच या अंतर्गत येणारे व्यापारचक्राचे सिद्धांत ही उत्पन्न व रोजगार विषयक सिद्धांताचा भाग ठरतात.
२. सामान्य मुल्य स्तराचा सिद्धांतः
ज्यात मुद्रामुल्याचे सिद्धांत तसेच चलनवाढ, चलनघट, इ. चा ही अभ्यास केला जातो.
३. आर्थिक विकासाचे सिद्धांत:
साधारणतः दुसऱ्या महायुद्धानंतर विकासाचे अर्थशास्त्र ही एक नवीन शाखा विकसीत झाली. ह्या अंतर्गत विकसनशील देश व विकसीत देशा संदर्भात लागू पडणाऱ्या आर्थिक विकास व अधिक वृद्धीच्या अनेक प्रश्नांचा अभ्यास यात केला जातो.
४. समष्टी वितरण सिद्धांतः
राष्ट्रीय उत्पन्नाचे उत्पादनाच्या चारही घटकात म्हणजे भूमी, श्रम, भांडवल व संयोजन यामध्ये खंड, वेतन, व्याज आणि नफा या स्वरुपात कशा प्रकारे विभाजन केले जाते म्हणजे उत्पादन घटकांना मिळणारे मोबदले ठरविण्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्र उपयोगी पडते.
५. आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत:
आंतरराष्ट्रीव्यापार सिद्धांतांची चर्चासुद्धा समग्रलक्षी अर्थव्यवस्थेत होत असताना दिसून येते. या शिवाय व्यवहारतोल व विनिमयदर देशात आर्थिक वृद्धी कोणत्या घटकांमुळे घडून येऊ शकते. या संदर्भात सुद्धा योग्य विश्लेषण समग्रलक्षी अर्थशास्त्रात केले जाते.
६. व्यवहारतोल आणि विनिमय दरः
एका विशिष्ट कालखंडात एका देशाने इतर देशांबरोबर केलेल्या दृश्य वस्तू व अदृश्य सेवांच्या आयात निर्यातीचा व्यवहार यांचा समावेश यात होतो. व्यवहारतोल तुटीचा आहे की वाढाव्याचा त्यावरुन त्यांच्या व्यवहाराची दिशा ठरत असते. अर्थात व्यवहारतोलावर विनिमय दराचा प्रभाव पडतो. विनिमय दर म्हणजे दोन देशातील चलनांची ज्या दराने देवाण घेवाण होते. तो दर होय. या सर्व बाबींचा अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रात होतो.
७. आर्थिक वृद्धीः
आर्थिक वृद्धी आणि वृद्धी विषयक सिद्धांत हा सुद्धा समग्रलक्षी अर्थशास्त्राचा महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. अर्थात विकसनशील देशांबाबतीत हे सिद्धांत आर्थिक विकासाचे सिद्धांत म्हणून ओळखले जातात. अशा प्रकारे समग्रलक्षी अर्थशास्त्र समग्र पातळीवर अनेक बाबीचा अभ्यास करते. परिणामी ह्या अर्थशास्त्राची व्यापकता खूप अधिक आहे.
क्रमश: