
भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भडगाव येथील आदर्श कन्या शाळेच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण तालुक्यात हादरून सोडले आहे. या घटनेने तालुक्यात एकच शोककळा पसरली आहे. नर्सरीमध्ये शिक्षण घेत असलेली दोन बालके शाळेच्या बाजूला असलेल्या शौचालयाच्या बाजूने वाहणाऱ्या कोल्हा नाल्यात पडलेल्या स्थितीत आढळून आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना मंगळवारी सकाळी १०. ३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकांपैकी अंश सागर तहसीलदार, वय ३ वर्षे ६ महिने, रा. बालाजी गल्ली, भडगाव, तर दुसरा बालक मयंक उर्फ संकेत ज्ञानेश्वर वाघ, वय ४ वर्षे २ महिने रा. आदर्श कॉलनी, भडगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही बालके नाल्यात पडून बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मात्र घटना कशी घडली याबाबत अधिक पोलिस तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेचा तपास भडगाव पोलिसांकडे न देता अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे द्यावा अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शाळेच्या शौचालय बाजूला कोल्हा नाला आहे. त्यास संरक्षण भिंतीला कोणताही अडोका, जाळी अथवा सुरक्षित व्यवस्था नसल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा पालकांचा आरोप आहे. इतक्या लहान वयाच्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर जाण्याची परवानगी कशी देण्यात आली? त्या वेळी शिक्षक व कर्मचारी कुठे होते? विद्यार्थ्यांवर योग्य देखरेख का ठेवली गेली नाही? संस्थेवर काय कार्यवाही कराल? असे अनेक गंभीर प्रश्न या घटनेनंतर नागरिक, पालकांनी उपस्थित केले. यावेळी नातलग व नागरिक तब्बल तीन तासहून अधिक वेळ शाळा परिसरात ठिय्या मांडून होते.
यावेळी येथील आदर्श कन्या विद्यालयातील खोलीत शिक्षकांना एकत्रित बसवून ठेवण्यात आले. त्यांना बाहेर सोडा, व संस्था चालकांना बोलावून आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्यांना जाब विचारू. आमचे मुले परत मागू, नाहीतर मृतदेह शाळेत आणू असा आक्रमक पवित्रा नातलगांनी घेतला होता. यावेळी शाळा परिसरात मोठ्या संख्येने नातलग, नागरिक एकत्रित झाले होते. यावेळी भडगाव पोलिस निरीक्षक महेश शर्मा, पाचोरा पोलिस निरीक्षक राहुल पवार आदी पोलिसांनी नातलगांची समजूत काढली. पोलिसांनी शाळा परिसरात चोख बंदोबस्त ठेवला.
या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच पालक, नातेवाईक व नागरिकांनी शाळेत धाव घेतली. परिसरात शोक व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. निष्पाप दोन जीव केवळ शाळेच्या हलगर्जीपणामुळे गमावले गेल्याचा आरोप पालक व नागरिकांकडून केला जात आहे.
सदर प्रकरणी संबंधित शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक व जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शाळांमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजना सक्तीने राबवाव्यात, अशी मागणी होत आहे. दोन कुटुंबांवर कोसळलेल्या या दुःखाच्या डोंगराने संपूर्ण भडगाव शहर हळहळले आहे.

