चाळीसगाव शहरातही मतदार याद्यांमधील घोटाळा समोर..!

0

 

लोकशाही संपादकीय लेख 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी महायुती सरकारने केल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी केल्यानंतर देशात खळबळ उडाली. त्यानंतर बिहारच्या आरएसएस यादीतील घोळ चव्हाट्यावर आला आणि हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले आणि त्याला ब्रेक बसला. त्यानंतर आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 च्या आत घेण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर विरोधी पक्षाच्या वतीने आधी पारदर्शक मतदार याद्या जाहीर करा, मगच निवडणुका घ्या… म्हणून मतदार यादी मधील सुधारणे संदर्भात विरोधी पक्षाचे वतीने राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि केंद्राचे वतीने नेमलेले महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची सलग दोन दिवस भेट घेऊन प्रश्नांचा भडीमार निवडणूक आयुक्तांना करण्यात आला. विरोधी पक्षाने नुसती भेटच घेतली नाही तर लेखी निवेदनही दिले. परंतु या याद्यांसंदर्भात आपल्या मागणीचे निरसन किंवा तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा अधिकार आम्हाला नाही. तो विषय केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तालयाकडे असल्याचे सांगून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी हात झटकले. मतदार याद्यांचा घोटाळा सध्या महाराष्ट्रात चांगलाच चर्चेचा विषय बदला आहे..

विरोधी पक्षासाठी याद्यांमधील घोटाळा घातक असून सत्ताधारी महायुतीतील महायुतीसाठी मात्र त्याचा फायदाच होणार आहे. जे 2024 च्या विधानसभेत झाले आणि महायुती प्रचंड बहुमताने सत्तेवर आली, ते होऊ द्यायचे नाही. म्हणून विरोधी पक्षाच्या वतीने कंबर कसण्यात आली आहे. निवडणूक आयोग ही घटनात्मक स्वायत्त संस्था असून त्यांनी निवडणूक पारदर्शक पद्धतीने घेतल्या पाहिजेत, तरच लोकशाही टिकेल. अन्यथा निवडणूक सत्ताधाऱ्यांच्या हातची बाहुली बनून एकतर्फी निवडणुका सत्ताधाऱ्यांकडून जिंकल्या जातील. म्हणून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निकोप वातावरणात व्हायच्या असतील तर मतदार याद्या पारदर्शक तयार केल्या पाहिजेत. त्यासाठी विरोधी पक्षाच्या वतीने मोहीमच सुरू केली आहे. येत्या एक नोव्हेंबरला मुंबईत मतदार याद्यांच्या पारदर्शकतेसाठी भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे विरोधी पक्षाने जाहीर केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आता मतदार याद्या हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. पारदर्शक मतदार याद्या नाहीत, तर निवडणुका नाहीत, असा पवित्रा विरोधी पक्षाने घेतला आहे.

मतदार यादी मधील घोटाळा आता संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. परवा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील मतदार याद्यांमधील घोळ भाजपचे माजी नगरसेवक माजी आणि माजी शहराध्यक्ष तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते घृष्णेश्वर पाटील यांनी समोर आणला. चाळीसगाव शहरातील मतदार याद्यांमध्ये 30 ते 40 हजार दुबार मतदारांचा घोळ आहे, असे पाटील यांनी सांगितले. चाळीसगाव नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक एक मधून घृष्णेश्वर पाटील गेल्या निवडणुकांमध्ये विजयी झालेले आहेत. त्यांनी आता नगरपरिषद निवडणूक होऊ घातलेली आहे. म्हणून प्रभाग क्रमांक एक मधील याद्यांचे अवलोकन केले तर प्रथम दर्शनी 317 दुबार मतदार असल्याचे त्यांनी त्यांना आढळून आले आहे. ही दुबार नावे कशा पद्धतीने यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत, या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन प्रोजेक्टरवर पुराव्यानिशी पत्रकारांना दाखवून दिले..

चाळीसगाव शहरातील मतदार यादी मधील घोटाळ्याबाबत स्पष्ट करताना दुबार नावे कशा पद्धतीने तयार झाली आहेत, हे घृष्णेश्वर पाटील यांनी दाखवून दिले. दुबार नावामध्ये एका ठिकाणी पत्रकाराचे स्वतःचे नाव वडिलांचे नाव व आडनाव आणि त्याचा पत्ता दिलेला आहे. त्याचे दुसरे ठिकाणी यादीत नाव तेच पण वडिलांचे नाव वगळून पत्ता बदलला आहे. हा नवीन व्यक्तीच नाही. तसेच चाळीसगाव लगत मालेगाव तालुका आहे. त्या तालुक्यामधील पोहोणे या गावातील ग्रामस्थांचा आणि विशेष म्हणजे त्या पोहोणे गावच्या सरपंचाचेही नाव चाळीसगाव शहरातील यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. घृष्णेश्वर पाटील यांनी हे सर्व प्रोजेक्टरवर प्रात्यक्षिकाद्वारे दाखवून दिले. त्यामुळे ‘हा जयद्रथ आणि हा सूर्य’ असे मतदार यादीतील घोळ बाबत दाखवून या संदर्भात राज्य निवडणूक आयोग जिल्हाधिकारी आणि चाळीसगावचे मुख्याधिकारी यांना लेखी निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत.

आता त्यावर जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी चाळीसगाव नगरपरिषदचे मुख्याधिकारी आणि राज्य निवडणूक आयुक्तांच्या वतीने कसे उत्तर दिले जाते? अथवा ही सर्व मंडळी हात वर करून मोकळे होतात? हे पाहायला मिळेल. परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार यादी पारदर्शक असल्या पाहिजेत. यासाठी विरोधी पक्षाचे कार्यकर्ते सतर्क झाले आहेत. एवढे मात्र निश्चित. या याद्यांच्या घोळ संदर्भात निवडणूक आयोगाकडून अद्याप उत्तर दिले जात नाही, याचे कारण काय? महायुतीतील नेत्यांकडून मात्र उत्तरे देऊन विरोधी पक्षांना पराभव दिसत असल्याने रडीचा डाव चाललाय, असा आरोप करून मोकळे होतात. परंतु मतदार याद्या निरपेक्षते बाबत आयोगाकडून उत्तर मिळणे आवश्यक आहे. एकंदरीत मतदार यादीतील घोटाळा आता गाव पातळीवर पोहोचला आहे, हे निश्चित..!

Leave A Reply

Your email address will not be published.