Friday, December 9, 2022

सुळे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य सत्तारांना भोवलं; महिला आयोगाकडून दखल, महासंचालकांना कारवाईच्या सूचना…

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपमानास्पद उद्गार काढल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाली आहे. महिलांना अपमानास्पद वागणूक देत, आक्षेपार्ह विधाने करत त्यांच्या  प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे, कमी लेखणे, कर्तुत्वहनन करणाऱ्या अशा वक्तव्याची आयोगाने दखल घेतली आहे. याप्रकरणी राज्याचे पोलिस महासंचालकांनी कायदेशीर कारवाई करावी आणि त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा असे आयोगाकडून सुचना देण्यात आली आहे, असं ट्विट महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अब्दुल सत्तार यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात तसंच मुंबईतल्या अब्दुल सत्तार यांच्या शासकीय बंगल्याबाहेर आंदोलन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेत सत्तारांचे कान टोचले. आता राज्य महिला आयोगाने देखील याची दखल घेतली असून पोलीस महासंचालकांना कायदेशीर कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावरून आक्रमक झाली आहे. पुढच्या 24 तासांमध्ये अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा राष्ट्रवादीच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे. दरम्यान अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावर उद्योगमंत्री आणि त्यांचेच सहकारी उदय सामंत यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. अब्दुल सत्तार यांनी वापरलेल्या शब्दाचं मी समर्थन करत नाही. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात, मात्र अब्दुल सत्तार यांनी टीका करताना चुकीचा शब्द वापरला, असं मत उदय सामंत यांनी व्यक्त केलं.

सत्तार काय बोलले

‘महाराष्ट्रामध्ये कोणतीही खळबळ उडाली नाही. मी माझ्याा बोलण्यावर ठाम आहे. जे आम्हाला खोके घेतले म्हणून बदनाम करत आहे, ते XXXचोट आहे. ते मग कुणीही असेल. खोके घेतले अशा शब्दांत जर कुणी टीका करत असेल तर त्याला उत्तर देण्यासाठी मी तयार आहे. मी जे बोलतोय खरं आहे. तुम्ही एका व्यक्तीचे नाव कशाला घेता. मी सर्वांसाठी बोललो. आता सर्वांसाठी बोललो. तुम्ही एका महिलाबद्दल बोलताय, तरीही सत्तार म्हणाले की, मी सर्वांसाठी बोललोय. अजून कुणीही बोलेल, ते ज्या भाषेत बोलले, त्याला उत्तर देईन.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या