लोकशाही न्यूज नेटवर्क
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी हटवली असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कांदा निर्यातीला मंजुरी दिली आहे. देशातील कांद्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने त्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती आणि आता 31 मार्च 2024 ही अंतिम मुदत ठेवली होती. परंतु ही बंदी अंतिम मुदत संपण्यापूर्वीच हटवण्यात आली आहे.
गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. बंदी हटवण्याच्या कारणाबद्दल बोलायचे झाले तर, गुजरात आणि महाराष्ट्राचा कांद्याचा स्टॉक पाहता सरकारकडून निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या स्थिती बद्दल माहिती दिली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी देखील केंद्र सरकार कांद्याच्या निर्यातीवर बंदी हटवण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात होते. कांद्याच्या किमती कोसळल्यानेदेखील निर्यात बंदीचा निर्णय मागे घेतला असल्याचे सांगितले जात आहे. आता केंद्रीय मंत्री समितीने बंदी हटवण्यासोबतच तीन लाख मॅट्रिक टन कांदा निर्यातीला देखील मंजुरी दिली आहे. यासोबतच बांगलादेशमध्ये देखील ५० हजार टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे.