सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान ‘भारत पर्व-२०२५’ साजरा होणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा
पाटणा : देशाचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त देशभरात १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान ‘भारत पर्व-२०२५’ साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी पाटण्यात केली.
शाह म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सोबत राहून सरदार पटेल यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कणा मजबूत केला. देशाच्या एकीकरणात त्यांचे योगदान अतुलनीय आहे. तथापि, काँग्रेसने तब्बल ४१ वर्षे सरदार पटेल यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-जदयू उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेले शाह यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही ३१ ऑक्टोबर रोजी गुजरातमधील एकता नगर (केवडिया) येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त भव्य परेडचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात आदिवासी नेते बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विशेष सांस्कृतिक सोहळे आयोजित केले जाणार असून, “स्टॅच्यू ऑफ युनिटी” येथे आदिवासी जीवन, ललित कला आणि विविध प्रादेशिक संस्कृतींचे दर्शन घडवले जाईल. यामधून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही भावना दृढ करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे शाह यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, जसे प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत परेड घेतली जाते, त्याच धर्तीवर दरवर्षी ३१ ऑक्टोबरला एकता नगरमध्येही भव्य राष्ट्रीय एकता परेड आयोजित केली जाईल. या परेडमध्ये केंद्रीय निमलष्करी दलासह विविध राज्य पोलिस दलांचे जवान सहभागी होतील.