लोकशाही न्यूज नेटवर्क
पुणे येथे विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाण याचा चांदीचे कडं देऊन सन्मान करण्याची घोषणा संग्राम भंडारे यांनी केली आहे. या घोषणेनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. संतोष चव्हाण याच्यामुळेच विद्यानंद बापट यांच्याबाबत आपल्याला माहिती मिळाली, असा दावा संग्राम भंडारे यांनी केला आहे. त्यामुळे चव्हाणचा सन्मान करण्याची भूमिका त्यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वी टीव्ही नाईन मराठीशी संवाद साधत असताना संतोष चव्हाण याने विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला केला होता. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. या घटनेनंतर संबंधित प्रकरणाची चर्चा झाली होती. दरम्यान, संतोष चव्हाणचा सन्मान करण्याच्या घोषणेवर विद्यानंद बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकारची कृत्ये ही केवळ प्रसिद्धीसाठीची ‘माकडचाळे’ असल्याची टीका त्यांनी केली.
“मला कार्यसिद्धी महत्त्वाची आहे,” असे बापट यांनी स्पष्ट केले. सवंग प्रसिद्धीसाठी कुणीही काहीही करत असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा प्रकार करणाऱ्यांवर संबंधित यंत्रणा नियमानुसार कारवाई करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. संतोष चव्हाणचा सन्मान करण्याच्या घोषणेवरून आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

