संतांचिये संगती : भाग १३
सर्वत्र ईश्वराला पहाण्याचा प्रत्यक्ष अनुभव केव्हा येतो? भगवान सांगतात, “बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते। वासुदेव: सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ:॥ भगवद्गीता।।६-१९॥” अनेक जन्म साधना, तपस्या, भक्ती केल्यावर ज्ञानी पुरुष मला प्राप्त होतो। सर्वत्र एकच वासुदेव (ईश्वर) आहे असा अनुभव ज्याला झाला असा महात्मा दुर्लभ आहे.
सदा संचला येत ना जात नाही।
रिता ठाव या राघवेविण नाही॥
॥ समर्थ रामदास॥
मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना।
मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थिता॥
॥ भगवद्गीता॥९।४॥
माझेया विस्तारलेपणे नावे।
हे जगचि नोहे आघवे।
जैसे दूध मुराले स्वभावे।
तरी तेची दही॥९-६४॥
का बीजचि जाहले तरु।
अथवा भांगारचि अळंकारु।
तैसा मज एकाचा विस्तारु। ते हे जग॥९-६५॥
या ओवीत सर्व जगत् ब्रम्हस्वरुप आहे हा सिध्दांत सांगीतला आहे। जे जे दृष्टी दिसे। ते ते हरि रूप। पूजा ध्यान जप त्यासी नाही॥ एकनाथ महाराज॥ जग आणि ब्रम्ह एक कसे हे सांगतांना ज्ञानेश्वर महाराज एक उदाहरण सांगतात। जसे दुधात विरजण टाकले कि दुधाचे दही होते, किंवा बी पेरले कि बीजाचे झाड होते, किंवा भांगारु म्हणजे सोन्याची लगड, त्याचे सोनार तापवून विविध दागिने करतो. दागिने आणि सोने जसे एकच तसेच जग सुध्दा ईश्वराचेच स्वरुप आहे. तुकाराम महाराजे पुढे म्हणतात, भेदाभेद मते भ्रमाचे संवाद। आम्हा नको वाद त्यांशी देऊ॥२॥ शास्र वाचन करताना आपल्याला अनेकांचे अनेक विद्वानांचे अनेक भिन्न भिन्न मते दिसतात। जो तो म्हणतो माझेच मत खरे. मतभिन्नता पाहून सामान्य मनुष्याची बुध्दी भ्रमीत, संशयीत होते.
संत तुलसीदास म्हणतात, श्रुति पुराण बहु कहेऊ ऊपायी। छूट न अधिक अधिक ऊरझायी॥ अनेक ग्रंथ वाचून अधिक अधिक जास्त संशय उत्पन्न होतात। एका संस्कृत सुभाषीतकाराने वर्णन केले, ” श्रृतिर्विभिन्ना स्मृतयश्च भिन्ना:। नैको मुनिर्यस्य वच: प्रमाणं । धर्मस्य तत्वं निहितं गुहायां। महाजनो येन गतो स पंथ:॥ वेद भिन्न, श्रुती भिन्न भिन्न मते सांगतात. असा एक ही मुनी नाही कि ज्याचे वचन प्रमाण मानावे। धर्माचे तत्व गुहेत पडले आहे. अशा वेळी आपल्या पुढे ज्यांचा आदर्श आहे असे संत, ज्ञानी पुरुष ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने जावे.
“वेद मार्गे मुनि गेले। त्याचि मार्गे चालिलो॥
“तु म॥ शब्दजालं महारण्यं चित्तभ्रमण कारणं।।
अत: प्रयत्नाज्ज्ञातव्यं तत्वज्ञात्तत्वमात्मन:॥६२॥
॥ विवेकचूडामणी॥–
वेद, शास्र, शब्दांचे जाळे हे एक मोठे अरण्य आहे. चित्ताला भ्रम, संशय उत्पन्न करणारे आहे, म्हणून मुमुक्षु ने एखाद्या जाणत्या, ज्ञानी महापुरुषा कडून, सद्गुरु कडून ज्ञान प्राप्त करावे. वादविवाद हे अध्यात्मात एक मोठे विघ्न आहे। आपलेच मत खरे असे म्हणून वादविवाद करणे. “वादो नावलम्ब्य:॥”नारद भक्तिसूत्र॥७४॥ अध्यात्मात वादविवाद करु नये. कारण “नैषा तर्केण मतिरापनेया” ॥कठोपनिषद॥१।२।९॥ ईश्वर तर्क बुध्दी चा विषय नाही। तुकाराम महाराज म्हणतात, ” आम्हाला भेदाभेद मते, वादविवाद, भ्रमाचे संवाद हे काही नको देवा।” शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात,
“तुका म्हणे अणु तुजविण नाही।
नभाहूनि पाही वाढ आहे॥३॥”
देवा, अणु सुध्दा तुझ्या विण नाही।
चराचरात तूच आहेस।
“अणोरणीयान्महतो महीयानात्मा गुहायां निहितोऽस्य जन्तोः।
तमक्रतुं पश्यति वीतशोको, धातुः प्रसादान्महिमानमीशम् ॥
श्वेता ॥श्वेताश्वतर उपनिषद ॥३-२०॥
अणोरणिया थोकडा, तुका आकाशा एवढा। गिळूनी सांडीले कलेवर, भव भ्रमाचा विचार। सांडीली त्रिपुटी, दीप उजळला घटी। तुका म्हणे आता उरलो ऊपकारा पुरता॥१॥ परमात्मा सूक्ष्मात सूक्ष्म लहानात लहान आहे, तसेच तो मोठ्यात मोठा आहे. हा परमात्मा प्रत्येकाच्या हृदय रुपी गुहेत राहतो। हे ईश्वरा तू आकाशा पेक्षा ही मोठा आहेस. “हे गगनाचे पांघरुण होय देखा।” “नभ तुज माजि खेळे लपीथपी”॥ज्ञानेश्वरी॥ ईश्वर आकाशाचे पांघरुण आहे. आकाशा पेक्षा मोठा आहे. हे देवा, तुझ्या स्वरुपात आकाश सुध्दा लपंडाव खेळते.
क्रमशः

रिटायर्ड मेडीकल ऑफिसर
नांदगाव, जि. नाशिक
मो. ९८२२४२८५७२

