संतांचिये संगती : भाग १२
“पावले पावले तुझे आम्हा सर्व। दुजा नको भाव होऊ देवा ॥१॥” तुकाराम महाराजांना ईश्वराचा साक्षात्कार झाला. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा तुझे सर्व आम्हाला प्राप्त झाले. संत जेव्हा ईश्वराशी एकरुप होतात तेव्हा ईश्वर संतांना आपले सर्व काही ऐश्वर्य देतो. याचे ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर वर्णन केले आहे,
“मग सावळा सकंकणु। बाहू पसरोनी दक्षिणु।
आलिंगीला स्वशरणु ।भक्तराज तो॥
हृदया हृदय एक जाहले। ये हृदयींचे ते हृदयी घातले।
द्वैत न मोडता केले। आपणा ऐसे अर्जुना॥१८-१४२१॥
आपल्या हृदयातील, आपल्या अंतरंगातील सर्व ज्ञान अर्जुनाच्या हृदयात प्रवेशीत केले. आत रिता कुंभ समुद्री रिगे। तो उचंबळत भरुनि निगे। का दशी दीपसंगे दीपुचि होय॥१७-१९॥ आत्मसाक्षात्काराच्या पूर्ण अवस्थेत ईश्वर संतांना आपले सर्वस्व देतो. जसे, रिकामा घडा समुद्रात टाकला तर तो भरुन वर येतो. ही सुध्दा ऊपमा अपूर्ण पडते म्हणून पुढे सांगतात, का दशी दीपसंगे दीपुचि होये॥ दशी म्हणजे दिव्याची वात. दोन दिवे जवळ ठेवले, पैकी एका दिव्यात तेल, वात व ज्योत आहे. एका दिव्यात फक्त वात व तेल आहे. दोन्ही दिवे एकमेकाच्या जवळ नेले तर पहिल्या दिव्याच्या संगतीने दुसरा दिवा ही पेटतो. आता दोघे दिवे सारखेच आहेत, तसेच, आपणा सारिखे करिती तात्काळ। नाही काळ वेळ तयालागी॥ याच प्रमाणे संतांना पूर्ण साक्षात्काराचे वेळी इश्वर सर्व काही देतो. तरी सुध्दा ईश्वर संतांना एक गोष्ट देत नाही. ती म्हणजे जगत उत्पन्न करणे, जगाची स्थिती व लय करण्याची शक्ती कोणालाच देत नाही. ते ईश्वराचे विशेष कार्य आहे. याला व्यासांचे ब्रम्हसूत्र- वेदान्त दर्शन ग्रंथ प्रमाण आहे.
“जगद्व्यापारवर्जं प्रकरणादसन्निहितत्वाच्च॥
ब्रम्ह सूत्र॥(वेदान्त दर्शन)॥४।४।१७॥
ईतकी ऊच्च अवस्था प्राप्त करुन सुध्दा तुकाराम महाराज देवा जवळ एक गोष्ट मागतात. “दुजा नको भाव होऊ देवा॥१॥” ते त्यांच्या साठी नाही, तर आपल्यासाठी मागतात. कारण संत तुकाराम माहाराजांना पूर्ण साक्षात्कार झाला होता. त्यांना कसली ही गरज नव्हती। संत ईतरांना आदर्श जीवन जगून दाखवतात.
“यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जन:।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते॥ गीता॥३।२१॥”
तैसे संत जगी क्रिया करुनि दाविती अंगी॥ दुजा भाव म्हणजे द्वैत भाव, भिन्नता, भेद. दुजा भाव का नको? कारण एखाद्याने परमार्थात ऊच्च अवस्था जरी प्राप्त केली तरी काही चूक झाल्यास त्याचे त्या ऊच्च पदावरुन पुन्हा अध:पतन होऊ शकते. ” तेऽपि पुनर्बंधनं यान्ति कर्मभि:॥ भागवत॥ त्याचे एक कारण दुजा भाव, द्वैत भाव. द्वितियाद्वै भय्ं भवति॥ उपनिषद॥ जो पर्यंत द्वैत आहे, तो पर्यंत भय आहे. वासना, अहंकार, द्वैत भाव ही अशी कारणे आहेत कि यामुळे ऊच्च अवस्था प्राप्त झाल्यावर सुध्दा पतन होऊ शकते। म्हणून अध्यात्मात साधकाने सतत जागृत राहिले पाहिजे. “जडभरत राजा हरिण गर्भी गेला। घाला तो घातला वासनेने॥” अशी अनेक उदाहरणे आहेत.
अभंगाच्या पुढील चरणात तुकाराम महाराज म्हणतात, “जेथे तेथे देखे तुझीच पाऊले। त्रिभुवन संचले विठ्ठला गा॥ फक्त विठ्ठलाची मूर्ती एवढाच विठ्ठल नाही. तर विठ्ठल (देव) सर्व ठिकाणी व्यापलेला आहे. हा महत्वाचा सिध्दान्त व संतांचा अनुभव येथे सांगीतला आहे. “सर्वं खल्विदं ब्रम्ह नेह नानास्ति किंचन॥ उपनिषद॥” सर्व ठिकाणी व सर्व काही ईश्वरच आहे। संत तुलसीदास वर्णन करतात, ” प्रभु व्यापक सर्वत्र समाना। प्रेम ते पगट होई मै जाना॥” परमेश्वर सर्व ठिकाणी व्याप्त आहे। जेथे प्रेम, भक्ती असते तेथे तो प्रगट होतो एवढेच.
“यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति।
तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति॥ गीता॥ ६।३०॥
जो मला सर्वत्र पहातो, व सर्व काही माझ्यातच आहे असे पहातो त्याला मी नाहिसा होत नाही व तो मला नाहिसा होत नाही॥ ६।३०॥ सर्वत्र माते किरिटी। पाहे पा अंतर्बाह्य दृष्टी। मग मीचि होसी सेवटी। लवण जैसे सागरी ॥ज्ञानेश्वरी॥ हे अर्जुना, तू मला अंतर्बाह्य सर्वत्र पहा. असे केल्यास जसे मीठ समुद्राला मिळाले कि समुद्र च होते, तसा तू सुध्दा मीच होशील.
क्रमशः

रिटायर्ड मेडीकल ऑफिसर
नांदगाव, जि. नाशिक
मो. ९८२२४२८५७२

