मुंबई
कालच केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली. काँग्रेस नेते नाना पटोलेंसह विरोधकांकडून रश्मी शुक्ला यांची निवडणुकीपूर्वी बदली करावी, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने सकारात्मक प्रतिसाद देत रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली करण्यात आली होती.
दरम्यान त्यांच्या बदली नंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी कोणाची वर्णी लागणार याची सातत्याने चर्चा रंगली होती. अखेर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रश्मी शुक्लांच्या बदलीनंतर राज्याच्या मुख्य सचिवांनी नवीन महासंचालकांच्या नियुक्तीसाठी तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे निवडणूक आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश दिले होते. यात मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सेवेतले वरिष्ठ अधिकारी संजय वर्मा आणि रितेश कुमार या तीन नावांचा समावेश होता. अखेर आज वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.