लोकशाही न्यूज नेटवर्क

सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्वाचा त्याग करणाऱ्यांना आता जनतेने नाकारले आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या सत्तेला सुरुंग लागताच संजय राऊतांना आता महाराष्ट्रात फिरण्याची आठवण झाली आहे. मात्र, नाशिक असो वा जळगाव, हिंदुत्वाची बेईमानी करणाऱ्यांना आता जनतेच्या दरबारात थारा मिळणार नाही,” अशा शब्दांत भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत आणि ठाकरे गटावर टीका केली.
भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मुंबईत एका विशेष पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटावर आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केलीत. यावेळी पश्चिम बंगालमधील राजकीय स्थितीपासून ते नाशिकमधील कुंभमेळ्यापर्यंतच्या सर्व मुद्द्यांवर त्यांनी भाजपची आक्रमक भूमिका मांडली.
यावेळी नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्या नाशिक दौऱ्यावर टीका केली. पश्चिम बंगालमध्ये ममतादीदींचा पराभव झाला. आता संजय राऊतांना जनतेमध्ये फिरण्याची आठवण झाली आहे. भांडुप ते नाशिक दौऱ्याने काहीही होणार नाही. अनेक वर्षे मुंबईत बसून राजकारण करणाऱ्या राऊतांना आता फिरण्याची वेळ आली आहे, पण हिंदुत्वाची साथ सोडल्यामुळे जनता उबाठा गटाच्या पाठीशी उभी राहणार नाही. हिंदुत्वाशिवाय या गटाला भविष्य नाही, असे नवनाथ बन म्हणाले.
कुंभमेळ्यात धर्मध्वज फडकल्याने संजय राऊतांच्या पोटात दुखतंय. भगवा सोडून हिरवा हाती घेतल्यामुळे त्यांना धर्मध्वजाचं महत्त्व कळणार नाही. भगवा ध्वज पाहून राऊतांना त्रास होतो, पण हिरवा ध्वज फडकल्यावर आनंद होतो. भाजप हिंदुत्वाचा ठेकेदार नाही तर सेवेदार आहे. उद्धव ठाकरे राम मंदिराला गेले नाहीत. ते या धर्मध्वज कार्यक्रमालाही आले नसते, असा टोला नवनाथ बन यांनी लगावला.
अदानी-अंबानींवर टीका करायची आणि त्यांच्याच लग्नात जाऊन डान्स करायचा, हा उबाठा गटाचा दुटप्पीपणा आहे. मातोश्रीवर कोणाचे रेड कार्पेट असायचे याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे. संजय राऊतांनी हनुमानाचं नाव घेऊ नये, त्यांचा आदर्श रावण आहे. महाविकास आघाडी रुपी रावणाचा जनता चक्काचूर करेल, असेही नवनाथ बन यांनी म्हटले.
कुंभमेळ्यासाठीचा खर्च हा हिंदू बांधवांच्या सुरक्षेसाठी आहे. औरंगजेबाच्या कबरीवर खर्च झालेला चालतो, पण कुंभमेळ्यावर आक्षेप का? ज्या मतदारसंघांत नावं वगळली तिथेच टीएमसी जिंकली आहे, त्यामुळे एसआयआरवर खापर फोडून ममतादीदींचा पराभव लपवू नका. पश्चिम बंगालमध्ये दीदीगिरी संपवण्याचं काम भाजप सरकार करेल, असेही नवनाथ बन यांनी ठामपणे सांगितले.
नाशिकमधील माडा घोटाळ्यावर बोलताना नवनाथ बन यांनी संजय राऊतांच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप केले. या घोटाळ्यात राऊतांच्या साथीदारांचे हात असल्याचा दावा करत सरकार चौकशी करेल, असे त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये झालेल्या कथित बेनामी गुंतवणुकीचीही चौकशी केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
रिंग रोड प्रकल्पाला हे लोक सुपारीबाजांच्या माध्यमातून विरोध करत आहेत, जसा त्यांनी समृद्धी महामार्गाला केला होता. मोदी १४० कोटी देशवासीयांचे सेवक आहेत, पाकिस्तानचे गुलाम नाहीत. या देशात राहायचं असेल तर ‘वंदे मातरम’ म्हणावंच लागेल, नाहीतर जनता उत्तर देईल. चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणात सरकार कठोर आहे, रोहित पवारांनी अशा संवेदनशील घटनांवर राजकारण करू नये, असेही नवनाथ बन यांनी म्हटले.


