लोकशाही न्यूज नेटवर्क
हर्षवर्धन राणे आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा हुसैन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट नऊ वर्षांनंतर शुक्रवारी थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे 2016 मध्ये बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. पण आता त्याला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत पहिल्यापेक्षा अधिक कमाई केली आहे. 2016 मध्ये ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटाने 8 कोटी रुपये कमावले होते. आता दोन दिवसांतच कमाईचा हा आकडा पार झाला आहे.
शुक्रवारी, पुनर्प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 4.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या दिवशी 5 कोटी रुपयांची कमाई झाली. दोन दिवसांत या चित्रपटाने कमाईचा 9.50 कोटी रुपयांचा आकडा गाठला आहे. पहिल्या वेळी हा चित्रपट फ्लॉप ठरला असला तरी त्यातील गाणी, हर्षवर्धन-मावराची केमिस्ट्री, प्रेमकहाणी सर्वच प्रेक्षकांना भावले होते. ओटीटी आणि टेलिव्हिजनवर या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळालं.
याआधी ‘गदर: एक प्रेम कथा’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘लैला मजनू’, ‘तुंबाड’ यांसारखे चित्रपटसुद्धा पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटांनाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.