आर्यन खानच्या मद्यपान व्हिडीओवर समीर वानखेडेंचे स्पष्टीकरण
एंजॉय केलं पाहिजे पण त्यासाठी तुम्ही.. : काय म्हणाले समीर!
लोकशाही न्यूज नेटवर्क
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला 2021 मध्ये ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अटक केली होती. एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे हे प्रकरण हाताळत होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत समीर यांनी त्या प्रकरणावर मौन सोडलं आहे. आर्यन खानवरील कारवाईनंतर त्यांना बऱ्याच टीकेलाही सामोरं जावं लागलं होतं. याविषयी ते एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “ट्रोलिंग हे माझ्यासाठी एकप्रकारचं मनोरंजन आहे. मी यापेक्षाही वाईट गोष्टी झेलल्या आहेत… गोळ्या, दहशतवादी. त्यांच्यापुढे ही खूप छोटी गोष्ट आहे. धमकीचे मेसेज जरा विनोदीच असतात.” कायदा सर्वांसाठी समान असतो असं म्हणत काहींनी कौतुक केल्याचंही त्यांनी सांगितलं.
तुम्ही शरीराला त्रास देऊ नका
काही दिवसांपूर्वी आर्यनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये तो नवीन वर्षाच्या पार्टीत मित्रांसोबत मद्यपान करताना दिसला होता. या व्हिडीओबद्दल वानखेडे म्हणाले, “मला त्या व्यक्तीबद्दल काही प्रतिक्रिया द्यायची नाही. पण जर तुम्ही थर्टी फर्स्टच्या पार्टीबद्दल बोलत असताल तर आजकालच्या तरुणांना वाटतं की नवीन वर्षाच्या आधीची संध्याकाळ ही उधळपट्टी करण्यासाठीत असते. लोकांनी एंजॉय केलं पाहिजे यात काही शंका नाही. पण त्यासाठी तुम्ही शरीराला त्रास देऊ नका.”
‘जवान’मधील डायलॉग थर्ड ग्रेड शब्द
आर्यन खानच्या अटकेच्या प्रकरणानंतर 2023 मध्ये शाहरुखचे ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. त्यापैकी ‘जवान’ या चित्रपटात शाहरुखच्या तोंडी असलेला एक डायलॉग तुफान चर्चेत आला होता. “बेटे को हाथ लगाने से पहले, बाप से बात कर” (मुलाला हात लावण्याआधी बापाशी बोल), असा हा डायलॉग होता. हा डायलॉग जाणूनबुजून चित्रपटात समाविष्ट केल्याचं म्हटलं जात होतं. समीर वानखेडे यांना उद्देशूनच हा डायलॉग त्यात लिहिण्यात आला होता, अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये झाली होती. याविषयी समीर म्हणाले, “अनेकांनी असं म्हटलं होतं की तो डायलॉग माझ्यासाठीच होता. पण मला तसं वाटत नाही. मी त्यांच्यासाठी इतका महत्त्वाचा नाही की त्यांच्या चित्रपटात ते माझ्यासाठी डायलॉग लिहितील. जरी तो माझ्यासाठी असला तरी मी ते कौतुक म्हणून स्वीकारेन आणि त्यातील शब्दांबद्दल बोलायचं झाल्यास, ते थर्ड ग्रेड शब्द होते. भारतीय संस्कृतीत असे शब्द वापरले जात नाहीत.”
आर्यनच्या अटकेबाबत म्हणाले..
आर्यनकडे कथितपणे ड्रग्ज सापडले नसतानाही त्याला अटक का केली असा सवाल विचारला असता वानखेडे यांनी सांगितलं, “मी या प्रकरणाबद्दल काही अंदाज लावत नाही. पण एक गोष्ट लोकांनी समजून घेणं आवश्यक आहे की जेव्हा एखादं ड्रग्ज तयार केलं जात असतं, तेव्हा त्यात पुरवठादार आणि ग्राहक अशा दोन बाजू असतात. जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने या प्रक्रियेत सहभागी असलेल्या एखाद्या व्यक्तीला अटक केली असेल तर असं गृहीत धरलं जातं की ज्या व्यक्तीने ग्राहकांना ड्रग्ज पुरवले त्याला अटक केली जाऊ नये? अर्थातच त्यांच्याकडे ड्रग्ज उपलब्ध असणार नाहीत, कारण त्यांनी ते आधीच संबंधित पक्षाला दिलेले असतात.”
माझ्यासोबत अशा पद्धतीची भाषा चालत नाही.
जेव्हा वानखेडे यांनी आर्यनला अटक केली, तेव्हा आर्यनने त्यांना “तू जानता नहीं मेरा बाप कौन है?” असं म्हणून दाखवल्याची चर्चा होती. यात काही तथ्य आहे का, असा प्रश्न समीर यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट केलं, “मला अशा गोष्टींवर प्रतिक्रिया द्यायची नाही. सर्वकाही मी कोर्टात सादर केलं आहे. जरी एखाद्या वेगळ्या केसमध्ये जर अशी भाषा वापरली जात असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई केली जाईल. माझ्यासोबत अशा पद्धतीची भाषा चालत नाही.”