मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आली होती. या धमकी दिलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर मुंबई क्राइम ब्रांचने काल पुण्यात जाऊन महाकाल उर्फ सौरभ उर्फ सिद्धेश हिराम कांबळे याची चौकशी केली.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणात संशयित आरोपी म्हणून त्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सलमान खानला आलेल्या धमकी पत्राबाबत महाकाल याची चौकशी केली असता त्यानं धक्कादायक खुलासा केला असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्य उद्देश कोणता ?
सलमान खान याला धमकी देऊन बॉलीवूड विश्वात भीती निर्माण करण्याचा उद्देश होता. जेणेकरुन बड्या कलाकारांकडून खंडणी वसुल करता येईल, असं महाकाल यानं पोलिसांनी केलेल्या चौकशीत कबुल केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. महाकाल याच्या कबुली जबाबानुसार सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर सलमान खानला धमकीचं पत्र देण्यामागे बॉलीवूड विश्वातून खंडणी वसुल करण्याचा हेतू होता.
.. तर पुढची रणनिती आखली असती
धमकीच्या पत्रातून बॉलीवूडमध्ये भीती निर्माण करण्याचा इरादा होता असा खुलासा महाकाल यानं केला आहे. खंडणीसाठीची रक्कम मिळाली असती तर पुढची रणनिती आखली गेली असती जेणेकरुन बॉलीवूडमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करता आलं असतं. याचा मास्टरमाईंड हनुमानगढचा विक्रम बरार होता. जो लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी बरार यांचा खूप जवळचा साथीदार आहे. बॉलीवूडमध्ये खंडणीखोरीचं जाळं सुरू करण्यासाठी प्रत्येक गोष्ट यानंच प्लॉट केली होती असाही खुलासा महाकाल यानं केल्याचं समजतं.
तीन लोकांची निवड
मिळालेल्या माहितीनुसार विक्रम बरार याच्या प्लानला खुद्द गोल्डी बरार यानंच हिरवा कंदील दाखवला होता. यानुसार विक्रम बरार यानं बॉलीवूडमधील खंडणीखोरीची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानं या कामासाठी राजस्थानमधील तीन लोकांची निवड केली होती. ज्यांची महाकाल याच्यासोबत कल्याण रेल्वेस्थानकात भेट झाली होती. सलमान खानचे वडील सलीम खान यांच्यापर्यंत पत्र कसं पोहोचवता येईल याचं संपूर्ण प्लानिंग यांनीच केलं होतं.
नेमकं त्याच बेंचवर धमकीचं पत्र
सलमान खानला देण्यात आलेल्या धमकीपत्रामागे त्याच्यावर हल्ला करण्याचा उद्देश नव्हता. फक्त बॉलीवूडमध्ये भीती निर्माण करायची होती असंही महाकाल यानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान ५ जून रोजी सलमान खानचे वडील सलीम खान यांच्या सुरक्षारक्षकाला एक पत्र सापडलं होतं. ज्या ठिकाणी सलमान आणि सलीम खान मॉर्निंग वॉकला जातात त्याच ठिकाणी हे पत्र सापडलं होतं. या पत्रात सलमान आणि सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ज्या ठिकाणी मॉर्निंग वॉक केल्यानंतर सलमान खान विश्रांतीसाठी थांबतो नेमकं त्याच बेंचवर धमकीचं पत्र ठेवण्यात आलं होतं. ज्यात तुमचाही सिद्धू मुसेवाला करू अशी धमकी देण्यात आली होती. २९ मे रोजी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.