मेहूण तापीतीरच संत मुक्ताईंचे तिरोभूत स्थळ ! 

0

लोकशाही विशेष लेख 

आज वैशाख वद्य दशमी, रविवार, दि. १४ मे २०२३ रोजी श्री क्षेत्र मेहूण (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) येथील तापीतीरावर संत आदीशक्ती मुक्ताई याच दिवशी शके १२१९ मध्ये गुप्त झाल्या. त्या घटनेला ७२६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त संत मुक्ताईंच्या तिरोभूत (गुप्त) होण्याच्या प्रसंगाची माहिती देणारा हा लेख…

मेहूण तापीतीरच संत मुक्ताईंचे (Saint Muktabai) तिरोभूत स्थळ !

जगाच्या उद्धारासाठी संतांनी अवतार धारण केला. याच संतांच्या मांदीयाळीत संत निवृत्तीनाथ (Saint Nivrittinath), संत ज्ञानेश्‍वर (Saint Dnyaneshwar), संत सोपानदेव (Saint Sopandev) आणि संत आदिशक्ती मुक्ताई यांचा समावेश प्राधान्याने होतो. साक्षात महादेव, विष्णू, ब्रह्मा आणि आदिशक्ती यांनी हा अवतार घेतल्याचे संत नामदेवांच्या शिष्या जनाबाई यांनी म्हटले आहे. चारही भावंडांनी आपल्या अल्पवयात ज्ञानाचे मोठे भांडार उघडून दिले. संत आदिशक्ती मुक्ताई व्यतिरिक्त संत ज्ञानेश्‍वरादी भावंडांनी संजीवन समाधी घेतली तर आदिशक्ती मुक्ताई तापीतिरी गुप्त झाल्या असा श्री संत नामदेव (Saint Namdev) महाराजांच्या अभंगात उल्लेख आहे. नामदेवांनी चारही भावंडे व चांगदेवरायांच्या समाधी प्रसंगांचे वर्णन करणारे विस्तृत असे अभंगरूपाने वर्णन केलेले आहे. ते त्यावेळी प्रत्यक्ष हजर असल्यामुळे त्यांच्या अभंगांना असामान्य असे महत्व प्राप्त झालेले आहे. अलिकडच्या काही आधुनिक कवींनी अथवा काही दंतकथाकारांनी यासंबंधी लेखन केलेले असले तरी हे लेखन करणारी मंडळी त्याकाळी नव्हती. त्यामुळे त्यांच्या लेखनास संत नामदेवांच्या अभंगांइतके महत्व देता येणार नाही. श्री संत ज्ञानेश्‍वरांनी आळंदी, सोपानदेवांनी सासवड तर चांगदेवांनी पुणतांबे येथे समाधी घेतली. चांगदेवांचा समाधी सोहळा आटोपल्यानंतर संत निवृत्तीनाथ, संत नामदेव यांच्यासह सर्व संत मंडळी नेवासे येथे आली.

तेथूनी वैष्णव आले नेवाशासी | सह समुदायेसी देवराज ॥

त्यानंतर सर्वांनी म्हाळसादेवी, टोकेश्‍वर, पैठण, आपेगाव, वेरूळ आदी तिर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले. उदास होवून हे शरीर रक्षू नये यासाठी आदीशक्ती मुक्ताई यांनी अन्नपाण्याचा त्याग केला. त्यावेळी निवृत्तीनाथांची मनात तळमळ सुरू होती. त्यांना कळले की, संत आदीशक्ती मुक्ताई गमनाची वेळ जवळ येत आहे. मुक्ताईला सांभाळण्याचे ते इतरांना सांगतात. तसेच प्रत्यक्ष आपल्या लहानग्या बहिणीचा हात धरून तिला सांभाळत ते चालू लागले. यादरम्यान नामदेव महाराज देवाला विचारतात,

नामा म्हणे देवा जाता तातडीने | पुढे स्थळ कोण नेमियेले ॥

चालिले श्रीरंग वैष्णवाचे भार | पहावे तापीतीर नामा म्हणे ॥

तापीतिराच्या संदर्भात विचार केला तर तापीनदीच्या उगमापासून म्हणजेच मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यापासून ते सूरतपर्यंत नदीच्या दोन्ही बाजूला तापीतीर म्हटले जाते. महाराष्ट्रापुरता विचार केला तर मुक्ताईनगर तालुक्यातील तर गुजरातच्या सीमेपर्यंत म्हणजेच प्रकाशा शहादापर्यंत तापीतीर म्हणता येते. त्यामुळे नेमके तापीतीर कुठले? तर त्यावेळी स्वत: पांडुरंग सांगतात त्याचे वर्णन नामदेव महाराज अभंगरूपाने करतात.

तापीचिये तिरी महत्ग्राम थोर | असे सोमेश्‍वर पुरातन ॥

तापीनदीच्या तिरावर महत्ग्राम म्हणजे सध्याचे मेहूण ता.मुक्ताईनगर हे स्थान आहे. तेथे पुरातन काळापासून भगवान भोलेनाथ सोमेश्‍वर नांदत आहेत. या ठिकाणाचा नेमका निर्देश करण्यासाठी नामदेवांनी पुढे म्हटले आहे की,

तेथे परशुरामे मारियेला बाण | पहा ती पुरातन पश्‍चिमेस ॥

संत नामदेवांचे हे म्हणणे दिशादर्शक आहे. यातून नामदेवांना दिशा दाखवायची आहे. याआधीच्या अभंगांमध्ये तापीतीर, महत्ग्राम, सोमेश्‍वर असा उल्लेख आहे. मात्र हे स्थान नेमके कोठे? यासंदर्भात नामदेव महाराज दिशानिर्देश करून सांगतात की, ज्याठिकाणी परशुरामाने बाण मारलेला आहे त्याठिकाणाच्या पश्‍चिमेस संत मुक्ताई गुप्त होण्याचे स्थान आहे. आजही आपण जर परशुरामांनी ज्याठिकाणी बाण मारलेला आहे तेथून पश्‍चिमेस पाहिले तर मेहूण येथील संत आदीशक्ती मुक्ताई देवस्थानाचाच निर्देश होतो. ज्याप्रमाणे विठ्ठलाची कितीही मंदीरे असली तरी पंढरपूरच्या विठ्ठलाचे विशेष महत्व आहे अगदी त्याचप्रमाणे संत आदीशक्ती मुक्ताई यांची इतर ठिकाणी कितीही मंदीरे असली तरी ती मंदीरे तापीतिरावर नसल्याने, परशुरामाने बाण मारल्याच्या पश्‍चिमेस नसल्याने, सोमेश्‍वराच्या सान्निध्यात नसल्याने श्री क्षेत्र मेहूण येथील संत आदीशक्ती मुक्ताई यांच्या देवस्थानालाच विशेष महत्व आहे. हे तिनही पुरावे स्वत: पांडुरंगाने सांगितले असून नामदेवांनी त्याचे वर्णन अभंगरूपाने केलेले आहे. त्याचप्रमाणे वैशाख वद्य दशमीच्या दिवशी तापीतीरावर अंघोळ केल्यानंतर,

करोनिया स्नान बैसले बाहेर | म्हणती अंध:कार फार झाला ॥

अंघोळ केल्यानंतर ओल्या कपड्यानिशी कोणतीही व्यक्ती किती अंतरापर्यंत जावू शकते? याचा विचार करणेदेखील गरजेचे आहे. याचा अर्थ अंघोळीनंतर सर्व संतमंडळी तापीतीरावरच बसली. त्यानंतर अतिशय जोरदार वारा वाहू लागला आणि सगळ्यांचे डोळे झाकले गेले. त्याचवेळी,

कडाडली वीज निरंजनी जेव्हा | मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली ॥

 

आदीशक्ती मुक्ताई वीजेत गुप्त झाली नसून वीजेचा संबंध फक्त कालदर्शक आहे. जेव्हा वीज कडाडली तेव्हा आदीशक्ती मुक्ताई गुप्त झाली असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे वीज पडून त्यात मुक्ताई गुप्त झाली असे म्हणणे चुकीचे आहे. तसेच ती वीज पडल्याचा नामदेवांच्या अभंगात कोठेही उल्लेख नाही. याचवेळी दुसरीकडे कोठे वीज पडली तर सांगता येणार नाही. कारण अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी वीज पडू शकते. परंतु नामदेवांच्या अभंगानुसार वीज पडल्याचा काहीएक संबंध नसून फक्त ज्यावेळी वीज कडाडली त्यावेळी आदीशक्ती मुक्ताई गुप्त झाली असा कालदर्शक निर्देश आलेला आहे. पुढे नामदेवांनी असे म्हटले आहे की,

मुक्ताबाई मुक्त केली केशवराजे | नामा म्हणे पूजा तापीतिरा ॥

 

तापीतीराची पूजा आजही श्री क्षेत्र मेहूण येथे अनन्यभावाने केली जाते. त्यामुळे मेहूण येथीलच तापीतीर संत आदीशक्ती मुक्ताई यांचे गुप्त स्थान आहे.

दुसरा महत्वाचा पुरावा चांगदेवांनी दिलेला आहे. सर्वगुणसंपन्न, विद्याविशारद, योगप्रक्रियेने चौदाशे वर्ष शरीर जतन करून ठेवणारे चांगदेवराय संत आदीशक्ती मुक्ताई यांचे लाडके शिष्य होते. अशा चांगदेवांनी मुक्ताई गुप्त होण्याच्या स्थळासंबंधीचा आगळावेगळा पुरावा दिलेला आहे, त्याला तोड नाही. ते म्हणतात,

धन्य धन्य मुक्ताबाई | तुमचे चरणी माझे डोई ॥

माझा केला अंगिकार | दाखविला परात्पर ॥

तेथे नांदे सोमेश्‍वर | तापीपूर्णा बरोबर ॥

चांगा आला लोटांगणी | लोळे मुक्ताई चरणी ॥

हा पुरावा आगळावेगळा कसा? तर मुक्ताई गुप्त होण्याच्या आधी त्यांनी हा अभंग लिहीलेला आहे. कारण मुक्ताई गुप्त होण्याच्या आधीच चांगदेवांनी समाधी घेतली होती. त्यांनी आधीच हे स्थळ कसे सांगितले? तर चांगदेव त्रिकालज्ञानी तर होतेच परंतु त्याबरोबर ते मुक्ताई अनुग्रहीत होते. तसेच चांगदेव महाराज चौदाशे वर्ष तापीतीर रहिवाशी असल्याने तसेच पुढील काळात संत मुक्ताई  गुप्त स्थान त्यांच्या वास्तव्यापासून तापीतीराने फक्त दोन मैलच अंतरावर असल्यामुळे एक शिष्याचे कर्तव्य म्हणून त्यांनी हा अभंगाचा पुरावा दिलेला आहे. मुक्ताई गुप्त होण्याचे स्थळ सर्वांना माहित व्हावे आणि आपल्याप्रमाणे सर्वांचाच उद्धार व्हावा हा शुद्ध हेतू मनात ठेवून त्यांनी मुक्ताई गुप्त होण्याचे स्थळ आधीच सांगून ठेवले. चांगदेव महाराज त्रिकालज्ञानी होते. चांगदेवांनी मुक्ताई गुप्त होण्याच्या आधीच,

तेथे नांदे सोमेश्‍वर | तापीपूर्णा बरोबर ॥

असे सांगून ठेवले. यात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. सोमेश्‍वराचे नांदणे आणि तापीपूर्णाचे बरोबर वाहणे. ही परिस्थिती श्री क्षेत्र मेहूण येथेच आढळते. चांगदेवला तापी व पूर्णा नदीचा संगम होवून पुढे त्या नद्या एकमेकांच्या सोबत वाहत मेहूण येथे आलेल्या दिसतात. आजही श्री क्षेत्र मेहूण येथील देवस्थानाजवळील तापीतिरावरून नदीकडे पहिल्यास तापीनदीचे पाणी काळेभोर तर पूर्णामाईचे पाणी गढूळ दिसते. याचा अर्थ चांगदेवांच्या अभंगानुसार या दोन्ही नद्या बरोबर वाहतांना फक्त मेहूण येथेच दिसतात. जगकल्याणाची आंतरीक इच्छा असल्यामुळे चांगदेवांनी संत मुक्ताई गुप्त होण्याचे स्थळ आधीच सांगून आपण लाडके शिष्य होण्याचे, मुक्ताई भक्त होण्याचे कर्तव्य पार पाडलेले आहे. संत आदीशक्ती मुक्ताई संदर्भात सांगावयाचे झाल्यास,

महाकल्पावरी चिरंजीव शरीर | किर्ती चराचर त्रिभुवनी ॥

श्री संत मुक्ताई महाकल्पार्यंत याच शरीरानिशी आजही मेहूण येथे आहेत. हा अधिकाराचा विषय आहे. अधिकारसंपन्न साधकाला आजही याची प्रचिती मेहूण येथे येते. हे अनुभवगम्य ज्ञान आहे, एक गुपीत आहे, एक दर्शन आहे तापीतिरावर असणार्‍या एका जागृत देवस्थानाचे तथा शिवशक्ती पिठाचे. त्यामुळे भाविकांनी मुक्ताई गुप्तस्थळी येवून आपली सेवा समर्पित करावी आणि आपल्या जीवनाचे सोने करून घ्यावे, मुक्ताई यांचा कृपाशीर्वाद मिळवून जीवन कृतार्थ करून घ्यावे.

 

डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील 

भुसावळ, जि. जळगाव 

भ्रमणध्वनी ८१४९४९८०२०

Leave A Reply

Your email address will not be published.