सहकारिता विभूषण’ पुरस्काराने शैलजादेवी निकम सन्मानित
कृभकोतर्फे राष्ट्रीय पातळीवर गौरव : मान्यवरांची उपस्थिती

जळगाव I लोकशाही न्यूज नेटवर्क
कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (कृभको) तर्फे दिला जाणारा मानाचा ‘सहकारिता विभूषण पुरस्कार 2024-25’ यंदा येथील शैलजादेवी दिलीप निकम यांना प्रदान करण्यात आला. देशभरातून केवळ दोनच व्यक्तींना हा सन्मान मिळाला असून त्यात निकम यांचा समावेश आहे.
हा पुरस्कार समारंभ कृभको च्या 45व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने दि. 25 रोजी नवी दिल्ली येथे संपन्न झाला. यावेळी कृभकोचे अध्यक्ष व्ही. सुधाकर चौधरी, एशिया पेसिफिकचे संचालक चंद्रपालसिंग यादव, इफकोचे चेअरमन दिलीप सिंघानिया, एनसीसीएफचे चेअरमन विशाल सिंग, माजी केंद्रीय कृषी मंत्री मोहनभाई कुंडारिया, कृभकोचे व्यवस्थापकीय संचालक एस.एस.यादव उपस्थित होते. शैलजादेवी निकम यांना सहकारी चळवळ बळकट करण्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करत ‘सहकारिता विभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शैलजादेवी निकम यांनी सहकारी चळवळीत अग्रणी योगदान दिले आहे.1995 ते 1997 या काळात त्या महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघाच्या उपाध्यक्ष व संचालक म्हणून कार्यरत राहिल्या. कृभकोच्या पहिल्या महिला संचालिका होण्याचा मानही त्यांना मिळाला. त्या महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघाच्या उपाध्यक्ष पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. 1997-99 या काळात त्या राष्ट्रीय महिला सल्लागार समितीच्या सदस्या होत्या. त्यांनी सहकारीता क्षेत्राच्या विकासाला गती दिली म्हणून त्यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव करण्यात आला.


