भारतीयांच्या सुटकेसाठी PM मोदींचा नवा मास्टर प्लॅन

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

रशिया-युक्रेन तणाव सुरु असून रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia Ukraine Crisis) आज पाचवा दिवस आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी युक्रेनच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली काल एक उच्चस्तरीय बैठक पार पडली.

आज पुन्हा एकदा एक उच्चस्तरिय बैठक होणार आहे. सरकारी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

केंद्र सरकारमधील काही केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारील राष्ट्रांमध्ये पाठवण्याची नरेंद्र मोदी तायरी करत असल्याची माहिती मिळाली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सोडवून आणण्यासाठी युक्रेनच्या शेजारील राष्ट्रांशी समन्वय साधण्याची गरज आहे. त्यासाठी त्याठिकाणी प्रत्यक्ष भारताचे प्रतिनिधी म्हणून काही केंद्रीय मंत्र्यांनाच पाठवण्याचे नियोजन सरकारकडून करण्यात येत आहे. ही माहिती सरकारी सूत्रांकडून मिळाली आहे.

यामध्ये केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्ही के सिंग या मिशनमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलंय की, भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासंदर्भातील सर्व इत्यंभूत माहिती देणारे एक अधिकृत ट्विटर अकाऊंट सुरु करण्यात आलं आहे. हे ट्विटर अकाउंट केवळ याच कारणासाठी समर्पित असेल. ‘OpGanga Helpline’ असं या ट्विटर अकाउंटचं नाव आहे. युक्रेन समस्येसंदर्भातील सर्व शंका आणि प्रश्न या ट्विटर हँडलवरच विचारण्यात यावेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.