लोकशाही संपादकीय लेख
भोंदू बाबा अशोक खरात याची आज पोलिस कस्टडी संपली असता स्पेशल कोर्टात खरातला उभे करण्यात आले. एक एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीची मुदत वाढवून मिळाली आहे.. खरातचा तपास अजून पूर्ण झालेला नसून त्यासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी एसआयटीतर्फे मागण्यात आली आणि ती मंजूर देखील झाली. खरातच्या कोठडी मंजुरीनंतर एसआयटी कडून शिवनिका ट्रस्टचे आजी-माजी सदस्यांची कसून चौकशी होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणजे महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना त्यासाठी खास समस एसआयटी कडून बजावण्यात आला आहे. भोंदू बाबा अशोक खराच्या शिवनिका ट्रस्ट सध्या एसआयटीच्या रडारवर असून त्याचा तपास करण्यात येणार आहे. शिवनिका संस्थानशी ज्यांची ज्यांची जवळीक होती त्यांची तसेच शिवनिका ट्रस्टचे आजी-माजी सदस्य एसआयटीच्या रडारवर आहेत. शिवनिका ट्रस्टचे सदस्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची देखील चौकशी होणार असून त्यांना एसआयटीने समन्स बजावला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनामा दिल्यानंतर आणि प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर एसआयटीच्या हालचालींना वेग आला आहे. महिला आयोग व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा चाकणकरांनी दिला की, घेतला गेला? हा वादाचा विषय असून तो राजीनामा मात्र मान्य झाला हे खरे आहे. आता रूपाली चाकणकरांकडे पक्षाचे कसलेच पद नाही. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला काय? किंवा त्यांना अटक झाली काय? हा पक्षाच्या इब्रातीचा प्रश्न येतच नाही. म्हणून त्यांच्या दोन्ही पदाचा राजीनामा घेतला गेला, हे विशेष होय. तरीसुद्धा ‘मेरी मुर्गीकी एकही टांग’ या म्हणीप्रमाणे माझे आहे ते खरे आहे, असेच दटवून सांगणाऱ्या रूपाली चाकणकरांचा मोठा भांडाफोड झाला. आता त्यांच्यावर चारही बाजूने आरोप होत आहेत.
रूपाली चाकणकरांचा राजीनामा हे तर होणारच होते. परंतु त्यांना सह आरोपी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी शिवसेनेच्या सुषमा अंधारे आणि रूपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे. रूपाली ठोंबरे पाटील म्हणतात की, ‘रूपाली चाकणकर या महिलांचे सेक्स रॅकेट चालवत होत्या. त्यांना सर्व प्रकारची माहिती होती की, महिला अशोक खरातच्या जाळ्यात कशाप्रकारे अडकत जात आहेत.’ त्यामुळे माहिती असूनही माहिती दडवली, असा मोठा आरोप रूपाली चाकणकरांवर होतो आहे. त्यामुळे रूपाली चाकणकर या आरोपी नंबर एक खराच्या नंतर, आरोपी नंबर दोनच्या आरोपी आहेत. त्यांना अटक करावी ही मागणी रूपाली ठोंबरे पाटील आणि सुषमा अंधारे यांनी केली आहे. त्याचबरोबर रूपाली चाकणकरांचे अशोक खरात या भोंदू बाबा बरोबर आर्थिक स्त्रोत काय आहेत? हे शोधले पाहिजे. सुषमा अंधारे आणि रूपाली ठोंबरे पाटील यांनी असा दावा केला आहे की, रूपाली चाकणकरांना महिला आयोग अध्यक्ष पदाच्या मानधनातून एवढी मोठी माया जमविता येणे शक्यच नाही. जी काही कोट्यावधीची प्रॉपर्टी चाकणकरांची आहे, ती अशोक खरात या भोंदू बाबाच्या संबंधातून निर्माण झालेली आहे. त्यामुळे गेले अनेक वर्ष त्यांचे असलेले संबंध सुमधुर असून त्यांच्या संपत्तीचा वाटा रूपाली चाकणकरांनाही मिळाला आहे. म्हणजे महिलांचे शारीरिक शोषण, चिंचोक्या, मध आदी मधून निर्माण केलेले कोट्यावधी रुपयात अशोक खरात बरोबरच्या संपत्तीत स्थितीमध्ये चाकणकरांचा समावेश असलाच पाहिजे आणि ती चौकशी होण्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक झाली पाहिजे अशी मागणी होत आहे…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कवच महिला आयोग अध्यक्ष म्हणून आणि महिला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून त्यांना होते. आता ते कवच गेले आहे. सदरचे कवच जाऊ नये म्हणून प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे हे रूपाली चाकणकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. चाकणकरांनी काहीही केले तरी तटकरे त्यांचे पाठीशी उभे राहायचे. त्यामुळे महिला आयोग अध्यक्ष पदावर असताना मोठा उत्पात त्या करू शकल्या. वैष्णवी हगवणे प्रकरणात आणि संपदा मुंडे प्रकरणात रूपाली चाकणकरांनी त्यांची बाजूच घेतली नाही. उलट त्यांचे चारित्र्यहनन करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, ही वस्तुस्थिती आहे. रूपाली चाकणकर एवढ्या पक्षद्वेष्ट्या होत्या की प्रांजल खेवलकर प्रकरणात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळे फोटोग्राफ वगैरे दाखवले होते. अर्थात तेथे कोणतीही महिलेची तक्रार नव्हती, तरीसुद्धा त्यांनी महिला आयोग म्हणून परदाफाश करण्याचा प्रयत्न केला. आता रूपाली चाकणकर या अशोक खरात यांच्याकडून पोलीस अधीक्षकांसमोर बसून काही आदेश काढले. त्याच पोलीस अधिकाऱ्याकडून आता त्यांची म्हणजे रूपाली चाकणकरांची चौकशी होते आहे, हे विशेष आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून वरिष्ठ लेवलच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून अनेक गोष्टी त्यांनी करून घेतल्या. आता तेच अधिकारी त्यांची चौकशी करत आहेत, ही एक विशेष बाब होय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाजू सोडून गेला. आता रूपाली चाकणकर या भाजपमध्ये दाखल होण्याचा विचार करत आहेत. मात्र ही गोष्ट शक्य नाही, कारण भाजपमध्ये त्यांना फार शत्रू आहेत..!

