नवी दिल्ली : महाकुंभमेळ्यादरम्यान प्रवाशांना मोफत प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल, असा दावा करणाऱ्या सर्व वृत्तांना रेल्वेने स्पष्टपणे नाकारले आहे. सर्व बातम्या निराधार आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.
महा कुंभमेळ्यादरम्यान प्रवाशांना मोफत प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल, असा दावा करणारे वृत्त काही प्रसारमाध्यमे प्रसारित करत आहेत, असे भारतीय रेल्वेच्या लक्षात आले आहे. भारतीय रेल्वे हे वृत्त पूर्णपणे निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याने स्पष्टपणे नाकारते, असे निवेदन भारतीय रेल्वेने जारी केले आहे. वैध तिकीटाशिवाय प्रवास करणे प्रतिबंधित आणि दंडनीय गुन्हा आहे, असे रेल्वेने म्हटले आहे. महा कुंभमेळा किंवा इतर कोणत्याही प्रसंगी मोफत प्रवासाची तरतूद नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
महाकुंभमेळ्यानिम्मित प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेवून पुरेशी व्यवस्था करण्यात आल्याचेही रेल्वेने सांगितले. रेल्वेच्या निवेदनात म्हटले आहे की, प्रवाशांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी अतिरिक्त तिकीट काउंटर आणि इतर आवश्यक सुविधांची पुरेशी व्यवस्था केली जात आहे.