
लोकशाही संपादकीय लेख
वारकरी संप्रदायाचे इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा झालेला शाही विवाह सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे. संगमनेर तालुक्यातील एका खेडेगावात शंभर एकर परिसरात हा सोहळा पार पडला. 10 एकर क्षेत्रात शाही मंडप आणि शंभर एकर परिसरात पार्किंगची व्यवस्था असलेल्या या सोहळ्यात तीन लाख लोकांचा समावेश होता. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह हजारो नेते कार्यकर्ते या लग्नात उपस्थित होते. यापूर्वी त्यांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम झाला होता तो देखील अशाच पद्धतीने गाजला. त्यावेळी इंदुरीकर महाराज यांच्यावर फार मोठी टीका झाली होती. त्यामुळे व्यथित झालेले इंदुरीकर महाराज महिना दोन महिना घराबाहेर पडले नव्हते. त्यातच त्यांना मोठा आजार जडला होता. टीकेला उत्तर देता देता त्यांच्या नाकी नऊ आले होते. साखरपुड्याचा राजेशाही थाट संपतो न संपतो तोच ज्ञानेश्वरी व साहिल यांचा शाही विवाह सोहळ्याच्या चर्चेला उधाण आले. कर्ज काढून लग्न करणे हे चुकीचे आहे, असे इंदुरीकर महाराज म्हणाले होते. त्यांनी हजारो मराठी तरुणांना मार्गदर्शन केले, पण आपल्याच घरात ज्ञानेश्वरीचा विवाह सोहळ्या विषयी एवढी चर्चा होईल असे त्यांना वाटले नव्हते. एक वारकरी संप्रदायाच्या माणसाने एवढा शाही विवाह सोहळा करणे कितपत योग्य आहे? विवाह सोहळ्याच्या निमित्ताने चांगला संदेश जाईल की त्याची वेगळी चर्चा होईल याबाबत त्यांच्या मनात अनेक कित्ते असतानाही हा विवाहसोहळा थाटात करण्याचा निर्णय त्यांनी का घेतला? 100 एकरचा तो परिसर, दहा ते बारा एकर परिसरातील भव्य मंडप आणि मंडपात जमलेले एकूण तीन लाख लोक, यांच्या गाड्यांचा ताफा, 100 एकर परिसरात पार्किंगची व्यवस्था हे सर्व दृश्य डोळे दिपवणारे होते. एक साध्या कीर्तनकार माणसाकडे एवढे पैसे आले कुठून? हा सवाल प्रत्येकाच्या मनात उभा राहतो, सहाजिकच आहे. जिथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लग्नात सामील झाले म्हटल्यावर इतर कार्यकर्ते तरी हजारोंच्या संख्येने सामील झाले असणार, यासोबत त्यांच्या गाड्यांचा ताफा तशाच पद्धतीने असणार, त्या लग्नात सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न अनेक जणांना अनेक देऊन उपस्थित करत आहेत.
ज्ञानेश्वरी व साहिल चिलप यांचा शाही लग्न सोहळा म्हणजे श्रीमंती, थाटमाट होय. आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन या शाही विवाह सोहळ्याच्या निमित्ताने मांडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात शाही विवाह सोहळा करण्याची आवश्यकता होती का? एक साधा कीर्तनकार कीर्तनातून लोकांचे प्रबोधन करतो. तसेच कीतर्न करणारे इंदुरीकर महाराज यांना हे शोभणारे होते का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे उत्तर नकारार्थीच येते. ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या आवडीनुसार लग्न सोहळा करावा असे म्हटले तर त्याला कुणाचा विरोध होणार नाही. उद्योगपती अंबानी यांच्या लग्नात त्यांनी त्या श्रीमंतीचे प्रदर्शन केले तर त्याला कोणी काही विचारत नाही. परंतु एक समाज प्रबोधन करणारा माणूस जेव्हा अशा पद्धतीने शाही विवाह सोहळ्याचा थाट मांडतो, तेव्हा त्याला अधिक प्रश्नांचे कांगोरे येतात. कोणता आदर्श समाजाने या लग्नाविषयी घ्यावा? जेणेकरून समाज प्रबोधन यांचा परिणाम होईल. इंदुरीकर महाराजांना ज्ञानेश्वरी आणि साहिल चीलप यांच्या शाही लग्नात गरिबांनी काय आदर्श घ्यावा? शेवटी आपल्या श्रीमंतीचा थाट जगासमोर दाखविण्याचा हा प्रकार नाही का? त्यामुळे वारकरी पंचातील माणसाकडून जेव्हा एवढ्या मोठ्या शाही लग्नाचा घाट घातला जातो तेव्हा साहजिकच विचारणा होते. हे काही ठीक नव्हे. शेवटी इंदुरीकर महाराज आणि चीलाप परिवार यांच्यातील मंडळींचे श्रीमंतीचे प्रदर्शन त्यांनी दिले. त्याला इंदुरीकर महाराज काय उत्तर देणार याला महत्त्व आहे..!

