रोटरी जळगावच्या आरआयपीई उपक्रमाचा समारोप!

रोटरीच्या बेसिक एज्युकेशन व लिटरसी प्राधान्य क्षेत्रांतर्गत उपक्रम

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

रोटरी क्लब जळगावतर्फे राबविण्यात आलेला रोटरी इग्निशन प्रोग्राम इन एज्युकेशन (आरआयपीई) हा उपक्रम यशस्वीपणे पूर्णत्वास पोहोचला. त्याचा समारोप नुकताच रोटरी क्लबच्या गणपती नगरातील सभागृहात प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

रोटरीच्या बेसिक एज्युकेशन व लिटरसी या प्राधान्य क्षेत्रांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. शहरातील दहा शाळांमधील लेखन कौशल्य व मुलभूत गणिती प्रक्रिया न जमणाऱ्या एकूण ३१० विद्यार्थ्यांची वर्षाच्या सुरुवातीला निवड करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांवर १२ प्रशिक्षित शिक्षिकांच्या माध्यमातून आठवड्यातून दोन दिवस नियमित विशेष मार्गदर्शन करण्यात आले.

वर्षभर चाललेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना अक्षरलेखन, वाचन, शब्दरचना, बेरीज-वजाबाकी, गुणाकार-भागाकार, घड्याळ अशा मूलभूत संकल्पनांवर पद्धतशीर प्रशिक्षण देण्यात आले. विविध खेळ व कृतींमधून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यात आला तसेच त्यांना अभ्यासाची गोडी लावण्यात आली. वर्षाच्या सुरुवातीला प्रशिक्षणाद्वारे वर्ग कसा घ्यावा, विद्यार्थ्यांना आवड कशी लावावी हे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या अभ्यासपद्धतीनुसार शिकविण्यात आले. त्या आधारावर दर आठवड्याला नियमित सत्रे शाळांमधून घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे वेळोवेळी मूल्यमापन करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा दिसून आली असून त्यांच्या आत्मविश्वासातही मोठी वाढ झाली आहे. केवळ विद्यार्थ्यांपुरते मर्यादित न राहता, या उपक्रमाने पालक व शाळांमध्येही सकारात्मक परिणाम दिसून आले.

रोटरी क्लब जळगावचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या क्षमता विकासासोबत समाजाच्या बळकटी देणारा ठरला असून समाजपरिवर्तनासाठी शिक्षण हीच खरी गुरुकिल्ली आहे, हा संदेश देणारा आहे. समारोप समारंभास विद्यार्थी, पालक, शिक्षक व मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा, मुख्याध्यापकांचा व कार्यरत शिक्षिकांचा गौरव करण्यात आला.

या उपक्रमात १. कै. अच्युतराव अत्रे इंग्लिश मिडीयम स्कूल, 2. जिजामाता माध्यमिक विद्यालय, 3. नंदिनीबाई वामनराव मुलीचे विद्यालय, 4. जयदुर्गा माध्यमिक विद्यालय, 5. श्रीराम माध्यमिक विद्यालय, 6. अभिनव विद्यालय, 7. शकुंतला विद्यालय, 8. शेवंताबाई खे. टोके प्राथमिक विद्यालय, 9. का. ऊ. कोल्हे माध्यमिक विद्यालय, 10. महाराणा माध्यमिक विद्यालय या शाळा सहभागी झाल्या. यात अदिती कुळकर्णी, विनिता भट, मिनाक्षी सुतार, स्वाती महाजन, पल्लवी शिंपी, प्रतिभा शिंपी, कल्पना शिंपी, योगिता पाटील, विनया जोशी, सपना थोरात, हर्षदा भंगाळे आदी शिक्षक सहभागी झाले.

“३१० विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत झालेला बदल पाहून आम्हाला खात्री पटली की योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी कोणतेही मूल मागे राहत नाही. RIPEमधून शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचा छोटासा पण प्रभावी प्रयत्न आम्ही केला आहे. ”

—गिरीश कुलकर्णी, अध्यक्ष

“आमचे उद्दिष्ट फक्त गुण वाढवणे नव्हते, तर विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची भीती दूर करून आत्मविश्वास निर्माण करणे होते. आज दिसणारा बदल हेच आमच्या प्रयत्नांचे यश आहे. ”

— वसुधा शिगवण, प्रकल्प व्यवस्थापक

Leave A Reply

Your email address will not be published.