राष्ट्रपती महोदया, आम्हाला खून करण्याची परवानगी द्या…;रोहिणी खडसे यांच्या पत्राने खळबळ
महिलांवरील वाढत्या अत्याचारांमुळे संताप ; राष्ट्रपतींना थेट पत्र लिहून मागणी
“राष्ट्रपती महोदया, आम्हाला खून करण्याची परवानगी द्या…;रोहिणी खडसे यांच्या पत्राने खळबळ
महिलांवरील वाढत्या अत्याचारांमुळे संताप ; राष्ट्रपतींना थेट पत्र लिहून मागणी
मुंबई प्रतिनिधी
महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे राज्यभर संताप व्यक्त होत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)च्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपतींना एक धक्कादायक मागणी करणारे पत्र लिहिले आहे.
या पत्रात त्यांनी “महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी आम्हाला खून करण्याची परवानगी द्या” अशी मागणी केली आहे. हे पत्र समोर आल्यानंतर सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
https://x.com/Rohini_khadse/status/1898207510227558827
“महिलांसाठी भारत सर्वात असुरक्षित देश” – रोहिणी खडसे
महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपतींना लिहिलेल्या या पत्रात रोहिणी खडसे यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचारांबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
त्यांनी नमूद केले की, “दोनच दिवसांपूर्वी मुंबईत १२ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे, पण सरकार आणि प्रशासन अपयशी ठरले आहे. नुकत्याच झालेल्या ‘वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू’च्या अहवालानुसार भारत हा आशिया खंडातील सर्वात असुरक्षित देश ठरला आहे.”
त्यामुळे महिलांना आता “अत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा आणि निष्क्रिय कायदा सुव्यवस्थेचा खून करण्याची परवानगी द्यावी” अशी मागणी त्यांनी केली आहे.
आम्ही का मागे राहावे?” ; ऐतिहासिक महिलांचा उल्लेख
या पत्रात त्यांनी ऐतिहासिक महापुरुषांचा उल्लेख करत म्हटले आहे की, “जेव्हा आपल्या देशावर संकट आले, तेव्हा महाराणी ताराराणी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तलवार उपसली. मग आमच्या समाजासाठी आम्ही का मागे राहावे?” त्यामुळे महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपतींनी या मागणीचा सकारात्मक विचार करावा, हीच खरी भेट असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सर्वत्र चर्चेचा विषय
रोहिणी खडसे यांच्या या पत्रानंतर राजकीय वर्तुळात आणि समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काहीजण त्यांच्या या भूमिकेला पाठिंबा देत आहेत, तर काहीजण यावर आक्षेप घेत आहेत. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केव्हा होणार, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.