मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावरील दरोडा : पोलिसांसमोर मोठे आव्हान!

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून होत असताना काल गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर रात्री अकरा वाजता पडलेल्या दरोड्याने त्याबाबत जणू शिक्कामोर्तब झाले असे म्हणावे काय? जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी वरून जळगाव पोलिसांनी बाबत टीकाटिप्पणी होत असताना परवा रात्री जळगाव शहरात सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन करून सुमारे 84 गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. जळगाव पोलिसांनी जळगाव वासियांना हा एक सुखद धक्का दिल्याने पोलिसांचे कौतुक होत असतानाच काल रात्री अकरा वाजता मुक्ताईनगर येथे राष्ट्रीय महामार्गावर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या असलेल्या पेट्रोल पंपावर दरोडा पडला. त्यात पाच जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने गावठी कट्टा, बंदुकीचा धाक दाखवून लाखो रुपयांचा ऐवज लुटून फरार झाले. दरोडा टाकताना या दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करून तेथीलही काही ऐवजी लुटला.

हा दरोडा रात्री अकरा वाजेच्या सुमारास पडला. म्हणजे अकरा वाजता महामार्गावर तसेच पेट्रोल पंपावर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे महामार्गावरील वर्दळीची या दरोडेखोरांना काहीच भीती वाटली नाही, हे विशेष. मध्यरात्री अडीच तीनच्या सुमारास दरोडेखोरांनी दरोडा टाकला असता तर ते समजू शकले असते. मध्यरात्री झोपेची वेळ असते. वाहनाची वर्दळ सुद्धा महामार्गावर कमी असते. परंतु ऐन रात्री अकराच्या सुमारास दरोडा पडावा, म्हणजे वर्दळीची या दरोडेखोरांना कसलीही भीती वाटली नाही हे विशेष. त्यातच सदर पेट्रोल पंप हे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीचा असल्याची माहिती सुद्धा या दरोडेखोरांना असली पाहिजे. म्हणजे केंद्रीय मंत्र्याच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकला जातो, तेव्हा इतरांचे काय? हा प्रश्न येथे अत्यंत महत्त्वाचा आहे.

रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकल्यानंतर दरोडेखोरांनी महामार्गावरील कर्की आणि वरणगाव येथील पेट्रोल पंपावर देखील बंदुकीची फायरिंग करून दहशत निर्माण केली, हे विशेष म्हणावे लागेल. एवढा पेट्रोल पंपावर दरोडा टाकला असताना या दरोडेखोरांना पोलिसांची कसलीच भीती वाटू नये, हे देखील विशेषच म्हणावे लागेल. या दरोडेखोरांनी यातून एक संदेश दिला आहे की, ‘आम्ही मंत्र्यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकतो तर इतरांचे काय?’ असाच प्रकार म्हणावा लागेल. दरोडेखोरांच्या धाडसाला मानले पाहिजे. दरोडेखोरांच्या या कृतीचे पोलिसांना जणू आव्हानच म्हणावे लागेल. गेल्या वर्षभरात जळगाव शहर आणि जिल्ह्यात खून, चोऱ्या, मारामारी आदी प्रकारची गुन्हेगारी वाढली आहे. काल जसे जळगाव शहरात सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत कॉम्बिन ऑपरेशन करून गुन्हेगारांना पकडण्यात आले, तसेच जळगाव जिल्ह्यात सर्वत्र कॉम्बिन ऑपरेशन केले तर अनेक गुन्हेगार आणि त्यांच्याकडे विनापरवाना असलेले गावठी कट्टे, बंदुका मोठ्या प्रमाणात आढळून येईल असे अनेकांना वाटते..

जळगाव जिल्ह्यात केंद्रीय मंत्री जर सुरक्षित नसतील तर इतरांचे काय? असा प्रश्न माजी मंत्री रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी केला आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पार बिघडली असल्याचा आरोप देखील ते करतात. त्यात चुकीचे काय? एकट्या एकनाथ खडसे यांनीच हे आरोप केले नाही, तर सत्ताधारी पक्षाच्या इतर आमदारांनी जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था बाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाचे नाथाभाऊच फक्त आरोप करत नाहीत, हे विशेष महत्त्वाचे आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत सर्व मंत्र्यांसमोर तसेच अधिकाऱ्यांसमोर एलसीबीच्या मुख्य पोलीस निरीक्षकांच्या वर्तनाबाबत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पूर्ण वस्त्रहरण केले होते. ही ताजी घटना होय. संबंधित पोलीस निरीक्षकांना निलंबित केले गेले, हा भाग अलाहिदा. तेव्हा कुंपणच शेत खातेय, असा आरोप जळगाव जिल्ह्यातील पोलिसांवर होतो आहे. याबाबत जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अंतर्मुख होऊन विचार करून जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सुधारण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील पोलीस हप्तेखोरीत मग्न आहेत, असा आरोप लोकप्रतिनिधींकडून केला जातोय. त्याबाबतही योग्य ती ॲक्शन जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चालणारे बोगस कॉल सेंटर जळगाव शहरानजीक सुरू होते. त्याचा थांब पत्ता संबंधित तालुक्याच्या पोलिसांना असू नये? हे एक गूढच होय. तसेच कोल्हे फार्म हाऊस येथे धाड टाकल्यानंतर आरोपी माजी महापौर यांना तालुका पोलिसांकडून कोठडीत शाही बडदास्त ठेवली जाते. त्यानंतर त्या पोलीस निरीक्षकाची कंट्रोल रूमला बदली केली, असा दिखावा केला जातो. ही बाब गंभीर आहे. आता मंत्री रक्षा खडसेंच्या मालकीच्या पेट्रोल पंपावरील दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांचा शोध जळगाव पोलिसांनी लावावा. त्यांच्या पुढे हे एक मोठे आव्हानच आहे..!

Leave A Reply

Your email address will not be published.