मनवेल ता. यावल

शासनाचा विविध योजनांतून शेतरस्त्यांच्या विकासाचे मोठमोठे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आजही चिखलातून पाय वाट काढत आहेत.
यावल तालुक्यातील मनवेल येथील स्मशानभुमीकडे जाणाऱ्या मुख्य शेतरस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः अडचणीचा ठरत आहे. परिणामी खरीप हंगामातील पेरणी, खते वाहतूक आणि वाईफेरीची कामांवर परिणाम होत असून, संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना या शेतरस्त्याने दररोज शेतात ये-जा करवी लागते; मात्र पावसामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी आणि चिखल साचला असून, बैलगाडी किंवा ट्रॅक्टर तर दूरच, साधे पायी चालणेही कठीण झाले आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी वाहने चिखलात रुतत असून, शेतीसाठी आवश्यक असलेले बियाणे, खते आणि अवजारे शेतात नेणे अशक्य झाले आहे. याबाबत संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


