ब्रेकिंग: रिषभ पंतच्या दुसऱ्या सर्जरीमुळे टीम इंडियाच्या अडचणीत वाढ

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

भारतीय क्रिकेट संघाला (Indian Cricket Team) मोठा धक्का बसला आहे. स्टार यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या अपघातानंतर टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. आतापर्यंत रिषभ केवळ वन डे वर्ल्ड कपच खेळणार नसल्याचे सांगण्यात येत होते, परंतु रिषभला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी आणखी बराच काळ लागणार आहे. रिषभ पंतवर दुसरी सर्जरी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी रिषभच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यानंतर तो दोन सेकंद का होईना उभा राहिला होता. त्यामुळे तो लवकर पुनरागमन करेल अशी आशा निर्माण झाली होती. पण, त्याची दुखापत गंभीर असल्याचे वृत्त समोर येताच तो २०२३ नव्हे, तर २०२४ मध्येही क्रिकेट खेळू शकेल कि नाही यात शंका व्यक्त करण्यात आली आहे. .

भारतात यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वन डे वर्ल्ड कप (ODI World Cup) होणार आहे. त्याआधी आयपीएल व जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनलही होईल, परंतु त्यात रिषभ पंत खेळणार नसल्याचे स्पष्ट आहे. पुढच्या वर्षी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या काही सामन्यांसह आयपीएल २०२४ व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही रिषभ खेळू शकणार नसल्याचे म्हंटले जात आहे. २५ वर्षीय रिषभवर मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलवर (Kokilaben Dhirubhai Ambani Hospital) उपचार सुरू आहेत.

पंतच्या दोन लिगामेंटला दुखापत झाली होती. त्यावर मुंबईतील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सहा आठवड्यानंतर त्याच्यावर तिसरी शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे यावर्षातील त्याला बहुतांश काळ मैदानाबाहेरच राहावे लागणार आहे. रिषभ पंत हा मैदानावर पुन्हा कधी परतणार याबाबत डॉक्टरांनी निश्चित वेळमर्यादा दिलेली नाही. मात्र बीसीसीआय (BCCI) आणि निवड समितीने रिषभ पंत हा किमान सहा महिन्यांसाठी क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहील, असा निष्कर्ष काढला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.