मोठी बातमी.. संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा

पाच महिन्यांतच निकाल, आरजी कर बलात्कार-हत्या प्रकरण

0

कोलकाता, लोकशाही न्यूज नेटवर्क 

देशात महिला अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे.  कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील बलात्कार व हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. याबाबत मोठी बातमी समोर आलीय. या गुन्ह्यातील आरोपी संजय रॉय याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. केवळ पाच महिन्यांतच कोर्टाने या प्रकरणाचा निकाल दिला आहे. आरोपीला 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

रुग्णालयातील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर देशभर खळबळ उडाली होती. ही घटना मागील वर्षी 9 ऑगस्टला घडली होती. याप्रकरणी रुग्णालयातच काम करणाऱ्या संजय रॉय याला अटक करण्यात आली होती. सियालदाह सत्र न्यायालयाने त्याला नुकतेच याप्रकरणी दोषी धरले होते. आज कोर्टाने संजयला शिक्षा ठोठावली.

मागील वर्षी 9 ऑगस्टला कोलकातामधील आरजी कार रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाच्या चौथ्या मजल्यावरील सेमिनार हॉलमध्ये पीडितेचा मृतदेह आढळून आला होता. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी मुख्य आरोपी संजय रॉय याला अटक करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो सेमिनार हॉलमध्ये प्रवेश करताना दिसत होता. त्याचे हेडफोनही घटनास्थळी सापडले होते. घटना उघडकीस आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. कोलकातासह देशभरातील विविध वैद्यकीय महाविद्यालये तसेच रुग्णालयाती विद्यार्थी, डॉक्टरांनी काम बंद ठेऊन, मोर्चे काढून घटनेचा निषेध केला. अनेक सामाजिक संघटनांचाही यात सहभाग होता.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेनंतर तातडीने नवा कायदाही आणला. मात्र, भाजपसह सर्व विरोधी पक्षांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. ममता बॅनर्जी सरकारकडून हे प्रकरण दाबण्यात आल्याचा, पुरावे नष्ट केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे हे प्रकरण नंतर कोलकाता पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवण्यात आले होते.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.