गरुड विद्यालयात रंगला माजी विद्यार्थ्यांचा मनोमिलन सोहळा
शाळेविषयी व्यक्त केली कृतज्ञता : स्नेहभोजनाचा आनंद घेत शालेय वर्गात भेट : आठवणींना उजाळा अन सर्वांची मनं झाली भावूक
शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील आ. ग. र गरुड माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात इयता १०वी शैक्षणिक वर्ष २०००- २००१ च्या विद्यार्थ्यांचे मनोमिलन सोहळा (गेट-टुगेदर) आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड होते. प्रमुख अतिथी संस्थेचे सचिव सागर जैन, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एस. चौधरी, उपमुख्यध्यापक व्ही. डी. पाटील उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते मान्यवरांचे तसे गुरुजनांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी तथा जळगाव महानगरपालिका सहायक उपायुक्त गणेश चाटे यांनी केले. शाळेची नवीन वास्तू जेव्हा तयार होईल त्यावेळेस अत्याधुनिक सुसज्ज ग्रंथालय सर्व माजी विद्यार्थ्यांच्या आर्थिक सहयोगातून देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय गरुड यांनी आपल्या मनोगतामध्ये माजी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा वाढता स्तर पाहून आनंद व्यक्त केला. तसेच सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे संस्थेचे सचिव सागरमल जैन यांनी आपल्या मनोगतामध्ये माजी विद्यार्थ्यांनी शाळेविषयी दाखवलेली आत्मीयता पाहून आनंद व्यक्त केला व शुभेच्छा दिल्या. मानवी विकासासाठी शालेय संस्कार व शिस्त यांचे महत्त्व त्यांनी सांगितले.
माजी विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षकांपैकी ए. टी. चौधरी, संजय उदार, भरत पाटील तसेच व्हि. डि. पाटील व आर. एस. चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. व शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. पत्रकार ॲड. देवेंद्र पारळकर यांनी मनोगत व्यक्त केले व हा उपक्रम दरवर्षी राबवावा असा मानस व्यक्त केला.
माजी विद्यार्थ्यांमधून खान्देश सुपरस्टार सचिन कुमावत, किरण मांडवडे (संशोधक,कृषी विभाग) पुरुषोत्तम वाघळे, कैलास सोनवणे, पंकज भारुडे यांनी शालेय जीवनातील आठवणीना उजाळा दिला. यावेळी माजी विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक संजय उदार, ए. टी. चौधरी, पी. डी महाजन, व्ही. डी. पाटील,भरत पाटील,शिंपी, महाजन मॅडम, डोळे मॅडम यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका योगिता चौधरी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रगटन उपशिक्षक प्रमोद सरोदे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन माजी विद्यार्थी तसेच शाळेचे उपशिक्षक शांताराम वानखेडे यांनी यशस्वीरित्या केले. यावेळी १०० पेक्षा जास्त माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमानंतर सर्वांनी भोजनाचा आनंद घेतला व शालेय वर्गात भेट देवून आठवणींना उजाळा दिला यावेळी सर्वांचे मन भावूक झालेले पाहावयास मिळाले.