लोकशाही न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाल्याने दुष्काळग्रस्त भागातल्या महिलांचा संताप आता रस्त्यावर उतरला आहे. ई-KYC पूर्ण न झाल्यामुळे हजारो महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावं लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करत महिलांनी मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन केलं. बंद झालेला दरमहा, १,५०० रुपयांचा लाभ पुन्हा सुरू करावा, अशी प्रमुख मागणी आंदोलक महिलांनी केली आहे.
या आंदोलनात दुष्काळाचा फटका बसलेल्या जिल्ह्यांतल्या महिलांनी सहभाग घेतला. आधीच शेती आणि मजुरीची कामं उपलब्ध नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यातच लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाल्याने महिलांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. ‘आम्हाला फसवल्यासारखं वाटतंय’ अशी भावना काही महिलांनी व्यक्त केली.
पालघरमधल्या शेतमजूर तानुजा बारप यांनी दुष्काळामुळे काम मिळणं बंद झाल्याचं सांगितलं. अशा परिस्थितीत योजनेतून मिळणारे १,५०० रुपये कुटुंबासाठी महत्त्वाचं होतं. पण ई-केवायसी मधल्या अडचणींमुळे हा लाभ बंद झाल्याने महिलांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलं.
आंदोलनादरम्यान समोर आलेल्या आकडेवारीनुसार, तब्बल ९२ लाख महिलांची नावं लाभार्थी यादीतून वगळण्यात आली असून, त्यापैकी ६२ लाख महिलांची ईकेवायसी प्रोसेस अपूर्ण असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे ईकेवायसी प्रोसेसमधल्या अडचणी दूर करून पात्र महिलांना पुन्हा योजनेत सामावून घेण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, आंदोलक महिलांनी सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्या. ईकेवायसी पूर्ण करण्यासाठी योग्य संधी द्या आणि पात्र लाभार्थी महिलांचे थकीत तसेच बंद झालेले हप्ते परत सुरू करावेत, अशी मागणी केली आहे. आता सरकार या आंदोलनाची दखल घेऊन लाडक्या बहिणींना परत १,५०० रुपयांचा लाभ देण्यासाठी काय निर्णय घेणार, याकडे महिलांचं लक्ष लागलं आहे.

