कसा असेल उद्याचा भारत देश ?

0

गणराज्य दिन विशेष लेख

मी मराठी, आपला महाराष्ट्र, आपला भारत देश असे आपण अभिमानाने नेहमीच बोलत असतो. परंतु आपला हा महाराष्ट्र, भारत देश उद्या कसा असेल याचाही विचार करणे तितकेच महत्त्वाचे आहे. कारण भारत या देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे पूर्ण होवुन ७८ वे वर्षे सुरू झालेले आहे.२६ जानेवारी या भारताच्या गणराज्य दिनानिमित्ताने भारत देशातील प्रत्येक खेड्यामध्ये, गावामध्ये  शहरामध्ये हा गणराज्य दिन मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात असतो. प्रत्येक शाळा, महाविद्यालय,कार्यालय पताका लावुन, छोटे-छोटे तिरंगा झेंडे लावुन ते सुशोभित करण्यात येते. तसेच तिरंगाही फडकविला जातो. परंतु कसा असेल उद्याचा भारत देश? या विषयावर चर्चा करावयाची असेल तर वर्तमान काळातील भारत देश जसा आहे त्या वरूनच भविष्यकाळातील म्हणजेच उद्याचा भारत देश कसा असेल? हा प्रश्न आपल्याला सर्वांनाच कोड्यात टाकणारा आहे.

सर्वात अगोदर आपण आजचा भारत देश कसा आहे या विषयावर चर्चा करु. तर आजच्या भारत देशातील काळ्या मातीतून सोने उगविणारा बळीराजा आत्महत्या करत आहे. बळीराजाने आत्महत्या केल्याचे वृत्त आपल्या हातात दररोज वर्तमानपत्र पडल्यावर एक तरी बातमी आपल्या दृष्टीस पडत असते. तर बळीराजा हा आत्महत्या का करतो? तर मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाल्याने, शेतात जास्त रक्कमेचे बियाणे टाकुनही पाऊस आल्या न कारणाने, तसेच योग्य वेळी शेतातुन योग्य पिक न आल्यामुळे बळीराजा दुष्काळी परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत असतो. त्याचबरोबर शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन तरुण, तरुणीही आत्महत्या करण्यात मागे नाहीत. काही विद्यार्थी परिक्षेचा अभ्यास झाला नाही म्हणून, परिक्षा जवळ आली म्हणून, परिक्षेत नापास झाले म्हणून, कोणत्याही व्यवसायात तोटा आला म्हणून, त्याचप्रमाणे प्रेमभंग झाला म्हणून आत्महत्या करतात. परंतु आत्महत्या करणे हाच यांसारख्या समस्यांवर उपाय असू शकतो काय? मुळीच नाही. तर उद्भवलेल्या परिस्थितीशी हिंमतीने दोन हात करत धैर्याने संकटांना सामोरे जाणे हाच यावरील उपाय आहे. मानवी जीवनात यश, अपयश तसेच सुखानंतर दुःख व दुःखानंतर सुख हे येतच असते. यालाच तर जीवन असे नाव आहे. त्यामुळे बळीराजा, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण, तरुणी यांनी आत्महत्या न करता धैर्याने संकटांना तोंड देणे हेच त्यांचे कर्तव्य ठेवावयास हवे.या समस्येतून कसा असेल उद्याचा भारत देश? हा प्रश्न प्रत्येकालाच पडत असतो.

तसेच दुसऱ्या गोष्टीचा विचार केला तर दैनंदिन जीवन जगत असतांना अनेक समस्या आपल्या दृष्टीस पडत असतात. त्यापैकी एक घृणास्पद गोष्ट अशी की, भारत या देशात मोठ्या प्रमाणात बलात्कार होत आहेत. दररोजच अमूक ठिकाणी बलात्कार झाला, तमूकने त्या स्त्रीवर बलात्कार केला असे दररोजच आपल्या कानी वृत्त पडत असते. अशा नराधमांना बलात्कार करण्याबद्दल कडक शिक्षा द्यावयास हवी. तरच असे घृणास्पद, वाईट प्रकार बंद होतील. यावरुनही आपल्याला एकच प्रश्न पडेल की, कसा असेल उद्याचा भारत देश ?

तसेच दुसऱ्या गोष्टीवर प्रकाश टाकावयाचा झाला तर, दैनंदिन जीवनात आपल्याला चेहर्‍यावर स्कार्फ बांधलेल्या मुली,तरुणी दिसतात. अशा प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात ही समस्या दिवसेंदिवस वाढत जावुन ती रौद्र रूप धारण करत आहे. ते यावरुन की, चेहर्‍यावर स्कार्फ बांधून आपल्या मित्रासोबत त्याच्या मोटारसायकल वर बसुन तरुणी आपल्या बापासमोरुन भुर्रकन उडत जाते. हे बापालाही समजत नाही. त्यामुळे या चेहर्‍यावर स्कार्फ न बांधल्याबद्दल अशा तरुणींना मार्गदर्शन करुन जनप्रबोधन करण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. या समस्येवरुनही आपल्याला हाच प्रश्न पडतो की, कसा असेल उद्याचा भारत देश ?

त्याचप्रमाणे दुसऱ्या समस्येचा विचार करावयाचा झाला तर ती समस्या अशी की, भारत या देशामध्ये प्रत्येक कार्यालयात नागरिकांचे कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी मोठ-मोठ्या अधिकार्‍यांकडून मोठ्या रक्कमेतील लाच घेतली जाते.या अधिकार्‍यांना मोठ्या रक्कमेत दर महिन्याला पगार मिळत असतो व तो पगार हा त्यांच्या कामाबद्दलच त्यांना मिळत असतो. तरीही असे अधिकारी नागरिकांचे काम करण्यासाठी त्यांच्याकडून ‘लाच’ मागतात व लाचलुचपत विभागातर्फे अधिकार्‍यांच्या हातुन ते पकडले जातात व तुरूंगात बसतात किंवा आपल्या नोकरी वरुन निलंबित होतात. तरीही लाच घेण्याचे प्रमाण आपल्याला कमी होतांना दिसत नसून ते दिवसेंदिवस वाढतच जात आहे. या प्रश्नावरुन देखील आपल्याला एकच प्रश्न पडेल तो म्हणजे कसा असेल उद्याचा भारत देश ?

त्याचप्रमाणे अजून महत्त्वाच्या प्रश्नाचा विचार करावयाचा झाला तर तो असा की, प्रत्येक क्षेत्रात नोकरीच्या जागी युवकांना नोकरीला लागण्यासाठी उच्च अधिकाऱ्यांकडून टेबलाखालुन मोठ्या प्रमाणात पैसा घेतला जातो. त्यामुळे ज्या युवकाकडे पैसा आहे तो पैसे भरुन नोकरीला लागतो व पैसे भरूनही अशा युवकांना काही वर्ष फुकट नोकरी करावी लागते.ज्याला आपण बोलीभाषेत “बिन पगारी, फुल अधिकारी ” असे म्हणतो. परंतु ज्या युवकाची आर्थिक परिस्थिती गरीबीची आहे त्याला पैसा उपलब्ध करता येत नाही, परिणामी भारत देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. यावरुनही आपल्याला हाच प्रश्न पडेल की, कसा असेल उद्याचा भारत देश ?

या वरील सर्व समस्यांवरुन, प्रश्नांवरुन आपल्या सर्वांना एकच प्रश्न पडेल तो म्हणजे, कसा असेल उद्याचा भारत देश ?

 

हेमंत वसंतराव चौधरी, 

चाळीसगाव, जि. जळगाव 

मो. नं. ९८९०७०३४८५

Leave A Reply

Your email address will not be published.