मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कमी होण्याची अपेक्षा होती आणि संजय मल्होत्रा यांनी आरबीआय गव्हर्नर म्हणून आपल्या पहिल्याच एमपीसी बैठकी व्याजदर कमी करून गृहकर्ज घेतलेल्या किंवा घेण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. यामुळे मध्यमवर्गीयांवरील गृहकर्जाच्या ईएमआयचा भार कमी होईल पण, पुढे कमी व्याज दरात कर्जही मिळू शकेल.
रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने व्याजदरात कपात केली, ज्यामुळे देशातील कोट्यवधी गृहकर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरबीआय एमपीसीने रेपो दरात 0.25 टक्के कपात केली आणि यासह रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्के वर आला आहे. आरबीआयने सुमारे 56 महिन्यांनंतर म्हणजेच मे 2020 नंतर रेपो दरात कपात केली असून गेल्या दोन वर्षांनंतरही रेपो दरांत बदल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. फेब्रुवारी 2023 पासून व्याजदरात कोणताही बदल झाला नव्हता.
कपातनंतर होईल फायदा
समजा तुम्ही 20 लाखांचे गृहकर्ज घेतले आहे आणि त्यावर 8.5 टक्के व्याज भारत असाल तर कालावधी 20 वर्षाचा असला तरी सध्या तुमचा ईएमआय 17 हजार 356 रुपये असेल. पण आरबीआयच्या दर कपातीनंतर कर्जाचे व्याज आता 8.25 टक्के होईल. अशाप्रकारे तुमचा ईएमआय आता 17 हजार 041 रुपयांपर्यंत कमी होईल, म्हणजेच तुम्ही दरमहा 315 रुपये वाचवू शकाल. त्याचवेळी, तुम्ही याच कालावधीसाठी 8.50 टक्के व्याजावर 30 लाखांचे कर्ज घेतले असल्यास तुमचा सध्याचा ईएमआय 26 हजार 035 रुपये होईल पण, आरबीआयने रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्सची कपात केल्यानंतर तुमचा मासिक ईएमआय 25 हजार 562 रुपयांपर्यंत कमी होईल. म्हणजे दरमहा तुमची सुमारे 473 रुपये बचत होऊ शकेल.