‘सावली’चे संस्थापक किशोर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन : जागेसाठी रेडक्रॉसचे नागरिकांना आवाहन
जळगाव : दीर्घकाळ आजारपणामुळे परावलंबी झालेल्या रुग्णांची काळजी घेणे अनेक कुटुंबांसाठी मोठे आव्हान ठरते. अशा रुग्णांना सुरक्षित निवारा, वैद्यकीय शुश्रूषा, पोषण, स्वच्छता आणि मानसिक आधार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जळगावमध्ये ‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर’ उभारण्याचा पुढाकार इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या जिल्हा शाखेने घेतला आहे, अशी माहिती सावली केअर सेंटरचे संस्थापक किशोर देशपांडे यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी मंगला ठोंबरे, डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, गनी मेमन, धनंजय जकातदार, राजेश यावलकर, सुभाष साखला उपस्थित होते.
या केंद्राच्या उभारणीसाठी योग्य बंगला किंवा इमारत उपलब्ध करून देण्याचे आवाहन रेडक्रॉसच्या वतीने करण्यात आले असून, प्रकल्पासाठी प्रारंभी सुमारे 25 लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. कोल्हापूर येथील सावली केअर सेंटरचे संस्थापक किशोर देशपांडे यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा या प्रकल्पासाठी उपयोग करून घेतला जाणार आहे.
दीर्घकाळ अंथरुणाला खिळून असलेले, दैनंदिन कामांसाठी इतरांवर अवलंबून असलेले तसेच ज्यांच्या देखभालीसाठी कुटुंबीयांना सातत्याने वेळ द्यावा लागतो, अशा रुग्णांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित देखभाल व्यवस्था उभारण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अनेकदा घरातील व्यक्तीच्या आजारपणामुळे संपूर्ण कुटुंबावर शारीरिक, मानसिक आणि आर्थिक ताण निर्माण होतो. अशा परिस्थितीत रुग्णांची योग्य काळजी घेण्याबरोबरच कुटुंबीयांनाही आधार मिळावा, या दृष्टिकोनातून सावली केअर सेंटरची संकल्पना पुढे आणण्यात आली आहे. हे केंद्र केवळ रुग्णांना निवारा देणारे ठिकाण न राहता, त्यांना आवश्यक शुश्रूषा, पोषक आहार, स्वच्छता, सुरक्षितता आणि मानसिक आधार देणारी व्यवस्था म्हणून विकसित करण्याचा रेडक्रॉसचा प्रयत्न आहे.
जळगावमध्ये केंद्र सुरू करण्यासाठी योग्य बांधकाम असलेला बंगला किंवा इमारत उपलब्ध होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील दानशूर नागरिक, बंगला व इमारत मालक, उद्योग समूह, सामाजिक संस्था तसेच सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. केंद्रासाठी विनामूल्य जागा उपलब्ध होण्याची प्रतीक्षा करत असतानाच प्रकल्प रखडू नये, यासाठी भाडेतत्त्वावरील जागेचाही पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. ‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर’ सुरू करण्यासाठी प्रारंभी सुमारे 25 लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्याचा प्रस्ताव रेडक्रॉसच्या बैठकीत मांडण्यात आला आहे. केंद्राच्या उभारणीसह त्याच्या कामकाजासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ उभे करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र ‘सावली केअर सेंटर निधी’ निर्माण करण्याचे नियोजन आहे.
कोल्हापूरच्या सावली सेंटरचे मार्गदर्शन
जळगावमधील केंद्राची उभारणी स्वतंत्रपणे करण्यात येणार असली, तरी कोल्हापूर येथील सावली केअर सेंटरचे संस्थापक किशोर देशपांडे यांचे मार्गदर्शन आणि आवश्यक ते सहकार्य घेतले जाणार आहे. कोल्हापूरमधील केंद्राच्या दीर्घ अनुभवाचा उपयोग जळगावमधील केंद्राची कार्यपद्धती निश्चित करताना केला जाणार आहे. रुग्णांची देखभाल, कर्मचारी प्रशिक्षण, प्रशासन, रुग्णांच्या दैनंदिन गरजा, भोजन व्यवस्था आणि केंद्राचे व्यवस्थापन या बाबींचे नियोजन करताना तेथील अनुभव उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे जळगावमध्ये स्थानिक गरजा लक्षात घेऊन प्रभावी आणि शिस्तबद्ध व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न राहणार आहे.
‘रुग्णसेवा हीच मानवसेवा’!
‘रुग्णसेवा हीच मानवसेवा’ या भावनेतून उभारण्यात येणाऱ्या या उपक्रमाला जळगावकरांनी लोकसहभागातून बळ द्यावे, असे आवाहन इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जिल्हा शाखा जळगावच्या वतीने करण्यात आले आहे. समाजातील दुर्बल आणि परावलंबी रुग्णांना सन्मानाने जगता यावे, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळावा, यासाठी हे केंद्र महत्त्वाची आधारव्यवस्था ठरू शकते. केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्यापासून ते आर्थिक मदत, आवश्यक सुविधा आणि व्यवस्थापनासाठी सहकार्य करण्यापर्यंत समाजातील विविध घटकांनी योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

