लोकशाही न्यूज नेटवर्क
सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता राज्य सरकार लवकरच सरकारी नोकरभरती करणार आहे. राज्यात नव्या पद्धतीने भरतीप्रक्रिया राबवण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर आता शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त जागा भरण्यासाठी चर्चा सुरु झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील भरती व्हावी, यासाठी मागणी करण्यात आली आहे.
राज्यात जवळपास ७० हजार पदांची भरती करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यातील बीएमसीमधील रिक्त पदे भरण्याची मागणी केली जात आहे. पालिका प्रशासनही याचा आढवा घेत आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत एकूण १ लाख ४५ हजार पदे आहेत. त्यापैकी फक्त ८९ हजार १३० पदे कार्यरत आहेत. त्यातील ५६ हजार १२६ पदांसाठी प्रशासनाने मान्यता दिली आहे. आता त्यातील ९ हजार २९५ पदांसाठी भरती करण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. यापैकी ५ हजार ४८६ पदांची भरती पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात टप्प्याटप्प्याने भरतीप्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी बैठक पार पडली आहे. लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. सर्वात आधी बृहन्मुंबई महापालिका प्रशासन, विविध शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भरती होणार आहे. महापालिका निवडणूकीनंतर हे काम सुरु झाले आहेत.
प्रशासनाच्या आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने ही भरती केली जाणार आहेत. महापालिकेने महसुली खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी रचनेचा पुनर्विचार सुरु आहे. डिजिटल कामांमुळे काही पदांची आवश्यकता कमी होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

