पाचोरा तालुक्यात दुर्मिळ हिंदी शिलालेखाचे वाचन!

पिंपळगाव हरेश्वर येथील तरुणांचा संशोधनात समावेश : बंजारा समाजाच्या भटक्या जीवनशैलीवर नव्याने प्रकाश

0

 

पिंपळगाव हरे.

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड-लोहारा रस्त्यावरील म्हसास तांडा येथे अप्रकाशित हिंदी शिलालेख आढळून आला आहे. त्याचे वाचन करून अर्थ लावल्याने मध्यप्रदेश-महाराष्ट्र सबंध व बंजारा समाजाच्या भटक्या जीवनशैलीवर नव्याने प्रकाश पडला आहे.

पिंपळगाव हरेश्वर येथील वन्यजीव संशोधक व इतिहासप्रेमी विवेक वाघे, नरेंद्र देशमुख व लातूर येथील इतिहास संशोधक कृष्णा गुदडे यांनी या शिलालेखाचे वाचन करून शिलालेखात उल्लेख असलेल्या राठोड कुटुंबीयांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा धांडोळा घेतला आहे. सदर शिलालेख ब्रिटिशकालीन असून त्याची तारीख पिल्ले जंत्रीनुसार 12 जुलै 1916 येत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘म्हसास तांडा’

मुळच्या भटक्या असलेल्या बंजारा समाजातील राठोड कुटुंबीय व्यापाराच्या निमित्ताने मध्यप्रदेशातुन लगतच्या जळगाव जिल्ह्यातील या ठिकाणी येऊन कायमचे स्थायिक झाले. म्हसास गावाच्या बाजूला येऊन नवीन तांडा स्थायिक झाल्याने या गावाला ‘म्हसास तांडा’ हे नाव मिळाले. पुढे गांगुसाध यांचे पुत्र, म्हणजेच रामचंद्र महाराजांचे वडील पुरासाध यांनी कुऱ्हाड-लोहारा या गावांना जोडणाऱ्या घाटमाथ्यावर भवानी देवीचे देऊळ बांधले. नंतरच्या काळात कुटुंबात प्रमुख असलेल्या रामचंद्र महाराजांनी वयाच्या 36 व्या वर्षी पारंपारिक व्यापार व सावकारी सोडून वैराग्य स्विकारले, पुढे सटाणा (जि – नाशिक) येथील देव मामलेदार यांचे शिष्यत्व स्विकारले आणि वयाच्या 72 व्या वर्षी समाधी घेतली. दरम्यानच्या काळात परिसरातील अनेकांनी रामचंद्र महाराजांचे शिष्यत्व स्विकारले, पैकी शेंदुर्णी येथील हरिप्रसाद तिवारी हे एक प्रसिद्ध होते.

अगोदर रामचंद्र महाराजांची समाधी

सदर समाधी मंदिर एकशे दहा वर्षांपूर्वी म्हणजे इ. स. 1916 ला बांधले. अगोदर रामचंद्र महाराजांची समाधी ही शिळेच्या स्वरूपात होती, मात्र गावकऱ्यांनी इ. स. 2005 साली ती बदलून त्या जागी मुर्ती बसवली व मंदिराच्या कळसाचे काम पूर्ण केले. येथे दरवर्षी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा भरते, परिसरातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. याशिवाय दत्त जयंतीलाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही येथे होते.

मुळच्या भटक्या असलेल्या बंजारा समाजाचे उल्लेख गेल्या शेकडो वर्षांच्या इतिहासात येत असले तरी खानदेशातल्या लिखित साधनात ते फारसे परावर्तित झालेले दिसून येत नाहीत. म्हसास तांडा येथे आढळून आलेला शिलालेख त्या दृष्टीने महत्वाचा आहे, याशिवाय महाराष्ट्रासारख्या मराठी भाषिक राज्यात हिंदी शिलालेख फारच दुर्मिळ समजले जातात; यामुळेच हा शिलालेख बंजारा समाज व एकूणच खानदेशच्या ऐतिहासिक दृष्टिकोनातुन महत्वाचा आहे. या कामात मनोज चव्हाण, पंकज माहुरे, जितेंद्र बडगुजर, राहुल धनगर व म्हसास तांडा येथील राठोड कुटुंबीयांचे सहकार्य लाभले.

शिलालेखाचे वाचन

रामचंद्र || श्री || माहराज

आदगुरु कुळ रामावत राठोड बंजारा गांगु साथ पूत्र पुरासाथ ऊनकी समाधी छत्री फत्तेगड नर्मदा किनारे पोता रामचंद्र साथ उनकी समाधी म्हसास तांडा शके १८३८ आषाढ शु. १२ बुधवार पुत्र काशीराम गुरूदयाल रायसिंग उनोने खर्च ११००० रुपये लगाके बनाया है ||

कारागीर सांडू शामजी कुमावत

शिलालेखाचा अर्थ

रामचंद्र || श्री || महाराज

रामावत कुळ असणारे, ज्यांचे आडनाव राठोड व जात बंजारा आहे, असे आद्यगुरु गांगुसाथ (ध, साध- ‘साधू’ या अर्थी) त्यांचे चिरंजीव पुरासाध- ज्यांची समाधी छत्री, नर्मदा (नदीच्या) किनारी – फत्तेगड (जोगा, जि – हारदा, मध्यप्रदेश) येथे आहे व त्यांचे (गांगुसाध) नातू रामचंद्र साध यांची समाधी म्हसास तांडा (ता – पाचोरा, जि – जळगाव) येथे शके १८३८ आषाढ शु. १२ वार बुधवार (म्हणजेच 12 जुलै इ. स. 1916) ला त्यांच्या मुलांनी (म्हणजेच) काशीराम, गुरूदयाल, (आणि) रायसिंग यांनी 11000 रुपये खर्च करून बांधली आहे. कारागीर सांडू शामजी कुमावत (होते).

Leave A Reply

Your email address will not be published.