लोकशाही विशेष लेख
मित्रहो, आज देशात सर्वत्र राष्ट्रीय युवा दिन आणि स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन साजरा केला जात असून या दिनाचे अवचित्त तसेच ‘ वाचन संकल्प महाराष्ट्राचा ‘ या अभियानाच्या पार्श्वभूमी वर हा लेख युवकांना समर्पित करीत आहे. गेल्या १ जानेवारी पासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या अभियाना अंतर्गत शैक्षणिक, सार्वजनिक, विशेष ग्रंथालये व अन्य शासकीय, निमशासकीय आणि खाजगी संस्था यांच्या वतीने वाचानाशी संबंधित विविध उपक्रम राबविण्यात येत असून यात प्रामुख्याने ग्रंथालय स्वच्छता, ग्रंथ प्रदर्शन, वाचक संवाद कार्यशाळा, लेखक आपल्या भेटीला, सामूहिक वाचन, विद्यार्थी पालक व लेखक संवाद, पुस्तक परीक्षण आणि अभिवाचन सारख्या उपक्रमांचा समावेश आहे यातून समाजात वाचन संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न होत आहे.
विशेषत तरुण पिढीचे मोबाईल आणि सोशल मिडिया कडून पुस्तकांकडे आकर्षित करण्याचा देखील हा प्रयोग आहे आणि यासाठी शासनाचे अगदी मनापासून कौतुक करावेसे वाटते. कारण गेल्या काही दशकात विशेषतः वाचनासाठी विषय निहाय व नियोजनबध्द तसेच जास्त अवधीच हा उपक्रम पहिल्यांदाच तयार करण्यात आले आहे असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही. या उपक्रमातून असंख्य संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र प्रश्न निर्माण होतो की, माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजां प्रमाणेच या माहितीच्या युगात शिक्षण देखील महत्वाचे असून वाचन आणि लेखन हे शिक्षणाचे दोन आधारस्तंभ असतांना विद्यार्थी किंवा नागरिकांना वाचन करायला लावण्यास करावी लागणारी ही धडपड पाहून मुळात शैक्षणिक विकासाचा पाया तर चुकत नाही ना असे वाटत असतांना मात्र ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा अभिनव उपक्रम एक सकारात्मक पाऊल असून असे उपक्रम ठराविक काळाने निरंतर सुरू राहणे गरजेचे आहे. अशा उपक्रमातून
* डिजिटल डिस्ट्रक्शन (Digital Distraction),
* पुस्तकांकडे परत (Back to Books),
* वाचायला शिका आणि शिकण्यासाठी वाचा (Learn to Read and Read to Learn),
* लिहिण्यासाठी वाचा आणि वाचण्यासाठी लिहा (Read to Write and Write for Reading) यांसारख्या नव संकल्पना जन्माला येवू शकतात.
मुळात वाचन म्हणजे फक्त अभ्यास नव्हे हे विद्यार्थ्यांना पटवून देणे महत्वाचे आहे. वाचन मनुष्याला परिपूर्ण करण्याचे एक उत्तम माध्यम आहे. इतरांसमोर आपले मत पटवून देण्यासाठी उत्तम शब्दांची मांडणी आवश्यक असते उत्तम मांडणी उत्तम शब्दाविना शक्य नाही आणि उत्तम वाचना शिवाय उत्तम शब्द सापडणे शक्य नाही म्हणून सर्वात आधी स्वत:ला घडविण्यासाठी वाचा वाचनाने सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक रचनेचे ज्ञानप्राप्त होते. कथा, कादंबरी, कविता आणि सुविचार यातून मनुष्यातल्या सृजनशीलतेची आणि विचारांची देवाण-घेवाण होते. मन में है विश्वास, वाट तुडवितांना अशा पुस्तकातून वाचनाने आलेला विश्वास आणि त्यातून बदललेले आयुष्याचे चित्रण होते.
विजय तेंडुलकर यांचे “घाशीराम कोतवाल”: हे नाटक ज्ञान आणि वाचनाच्या सामर्थ्यावर भर देते. भालचंद्र नेमाडे लिखित “माझे विद्यापीठ”: हे आत्मचरित्रात्मक कार्य शिक्षण आणि वाचनाच्या व्यक्तीच्या जीवनावरील परिवर्तनात्मक प्रभावावर प्रकाश टाकते. रणजित देसाई लिखित “श्रीमान योगी”: ही ऐतिहासिक कादंबरी नायकाच्या प्रवासात वाचन आणि शिकण्याचे महत्त्व दर्शवते. लक्ष्मीबाई टिळकांचे “स्मृतीचित्रे”: हे आत्मचरित्र वैयक्तिक वाढ आणि आत्म-जागरूकतेमध्ये वाचनाच्या भूमिकेवर भर देते. सुधामुर्ती यांची पुस्तके महिला शक्ती, सामाजिक चळवळ आणि उत्तम व्यक्तिमत्व निर्मितीवर भर देते. भालचंद्र नेमाडे लिखित “कोसला”: ही कादंबरी वाचन आणि शिक्षणाद्वारे नायकाचे बौद्धिक प्रबोधन करते. असे अनेक पुस्तके आहेत की ज्यातून अनेक व्यक्तींचे आयुष्य एक मोठ्या उंची पर्यंत पोहचले आहे आणि या व्यक्तींनी देशाच्या विकासात आपले एक मोठे योगदान दिले आहे.
म्हणूनच ‘वाचन स्व:विकासासाठी, वाचन राष्ट्रासाठी’ असे म्हणावेसे वाटते. आज ग्रंथांचे महत्व फक्त तार्किक ज्ञाना पुरते मर्यादित राहिले नसून मानसिक स्वास्थ टिकविण्यासाठी व नैराश्य मिटविण्यासाठी देखील पुस्तकांचा वापर शास्त्रीय चिकित्सा पद्धतीने केला जात असून या पद्धतीला ग्रंथोपचार अस म्हटले जाते. याव्दारे देखील आत्मविश्वास निर्मिती, मानसिक स्थैर्य, सकारात्मक दृष्टिकोन निर्माण केले जाते. याचाच अर्थ असा की पुस्तकांना जत तुम्ही तुमचे मित्र केले तर त्या तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत आधार देतात. स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वा. विनायक सावरकर, साने गुरुजी, डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम असे असंख्य युवकांचे प्रेरणास्थान हे वाचनातूनच घडलेले व्यक्तिमत्व असून यांनी स्वतः घडून राष्ट्र घडविण्याचे ईश्वरीय कार्य देखील केले आहे.
आज युवा दिन आणि स्वामी विवेकानंद जयंती असून या निमित्ताने मी आजच्या युवकांना शिक्षणा व्यतिरिक्त अधिकचे वाचन करावे असे आवाहन करतो आणि शासनाच्या वाचन चळवळी साठी सुरू केलेल्या या उपक्रमाचे अगदी मनापासून स्वागत करतो.

ग्रंथपाल, विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत
के. ए. के. पी संस्थेचे वाणिज्य आणि
विज्ञान महाविद्यालय, जळगांव
मो. ९६०४००९९९७