राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राणा दाम्पत्याच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.  राणा दाम्पत्याने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्यावरून मोठा संघर्ष निर्माण झाला होता.  या प्रकरणी मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हाही दाखल केला होता. यानंतर आता मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला नोटीस बजावली असून ८ जून रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबईतील खार पोलिसांकडून ४ जून रोजी ही नोटीस राणा दाम्पत्याच्या मुंबई वांद्र्यातील निवासस्थानी पाठवण्यात आली होती. यानुसार दोषारोपपत्र दाखल करण्याच्या कार्यवाहीसाठी ८ जून रोजी न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. राणा दाम्पत्याने महाविकास आघाडी सरकारसह मुंबई पोलिसांवरही अनेक गंभीर आरोप केले होते. राणा दाम्पत्याने कोठडी आणि लॉकअपमध्ये असभ्य वागणूक दिल्याबद्दल पोलिसांवर विविध आरोप केले होते.

मुंबई खार पोलीस ८ जून रोजी राणा दाम्पत्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार आहेत. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यासाठी ते मुंबईतही दाखल झाले. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. शिवसैनिकांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानाबाहेर पहारा दिला. तसेच, राणा दाम्पत्याच्या वांद्र्यातील निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी घेराव घातला होता.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी राणा दांपत्याविरोधात आयपीसीच्या विविध कलमांतर्गत आणि आयपीसी कलम १२४ (अ) अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी राणा दाम्पत्याला अटक करुन न्यायलयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर तब्बल १२ दिवसांनी दोघांनाही सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here