रावेरमध्ये वनविभागाची मोठी कारवाई; १६५ किलो अवैध डिंक जप्त
अहिरवाडी आणि जुनोना येथे तीन ठिकाणी कारवाई, दोन दुचाकीसह ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त
रावेर प्रतिनिधी
तालुक्यातील अहिरवाडी आणि जुनोना येथे वनविभागाने अवैध डिंक तस्करीविरोधात मोठी कारवाई करत १६५ किलो सालई आणि धावडा डिंक जप्त केला आहे. या कारवाईत दोन दुचाकींसह ७२ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वनविभागाच्या धडक कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अवैध तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
अहिरवाडी (कं. नं. ५) – वनक्षेत्रात गस्त घालत असताना एका व्यक्तीला दुचाकीवरून गोण्या नेताना पकडण्यात आले. तपासणीअंती ९८ किलो सालई डिंक (१०,७८० रुपये किमतीचा) आणि (एमएच १९ एजी १७२३) क्रमांकाची दुचाकी (१५,००० रुपये किमतीची) जप्त करण्यात आली.
गस्तीदरम्यान एक तस्कर दुचाकीवरून डिंक घेऊन जात असताना दिसला. पाठलाग केल्यावर त्याने ५ हजार रुपयांच्या ४७ किलो सालई डिंकची गोणी फेकून पळ काढला.
जुनोना येथेही एक तस्कर दुचाकीवरून डिंक घेऊन जात असताना दिसला. वनअधिकाऱ्यांनी पाठलाग केला असता, तो (एमपी १० बीए १४६९) क्रमांकाची दुचाकी आणि ४ हजार रुपयांचा डिंक टाकून पसार झाला.
एकूण जप्त माल
१६५ किलो डिंक २ दुचाकी एकूण किंमत – ७२,९५० रुपये संपूर्ण मुद्देमाल आगरडेपो, रावेर येथे जमा
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई निनू सोमराज (वनसंरक्षक, धुळे प्रा. वनवृत्त), जमीर शेख (उपवनसंरक्षक, यावल वनविभाग), आर. आर. सदगीर (विभागीय वन अधिकारी, दक्षता, धुळे), प्रथमेश हडपे (सहा. वनसंरक्षक, चोपडा), समाधान पाटील (सहा. वनसंरक्षक, यावल) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यशस्वी कारवाई करणाऱ्या पथकामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, वनरक्षक जगदीश जगदाळे, आयेशा पिंजारी, सविता वाघ, वनमजूर सुभाष माळी, इनुस तडवी, विनोद पाटील यांचा समावेश होता.वनविभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैध तस्करी करणाऱ्या टोळ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

