रावेर पोलीस स्टेशनच्या वार्षिक तपासणीत कायदेविषयक परीक्षेत पोलीस अंमलदारांची उत्कृष्ट कामगिरी

0

रावेर पोलीस स्टेशनच्या वार्षिक तपासणीत कायदेविषयक परीक्षेत पोलीस अंमलदारांची उत्कृष्ट कामगिरी

रावेर,प्रतिनिधी भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी फैजपूर उपविभागांतर्गत रावेर पोलीस स्टेशनला सन २०२४-२५ च्या कालावधीतील वार्षिक तपासणी नुकतीच घेतली. या तपासणी दरम्यान, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदारांना नवीन कायद्यांची अंमलबजावणी, परिपत्रके आणि न्यायालयीन निवाड्यांची अद्ययावत माहिती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने कायदेविषयक परीक्षा आयोजित करण्यात आली होती.फैजपूर उपविभागात सन २०२३ पासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत १०० गुणांची ही परीक्षा घेण्यात आली. यात भारतीय न्याय संहिता २०२३ (२५ गुण), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ (२५ गुण), भारतीय साक्ष अधिनियम २०२३ (१० गुण), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ (१० गुण), किरकोळ कायदे (१० गुण) आणि महाराष्ट्र पोलीस नियमावली १९५९ (२० गुण) या विषयांचा समावेश होता.या परीक्षेचे नियोजन रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पोलीस उपनिरीक्षक धनश्याम तांबे, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन आणि महिला पोलीस उपनिरीक्षक दिपाली पाटील यांनी उत्कृष्टरीत्या केले. परीक्षेसाठी रावेर पोलीस स्टेशनचे ५४ आणि निंभोरा पोलीस स्टेशनचे ४, असे एकूण ५८ पोलीस अंमलदार उपस्थित होते.परीक्षेत रावेर पोलीस स्टेशनचे पोहेकॉ. सुनिल  वंजारी (क्र. २९८२) आणि पोहेकॉ. रविंद्र भामरे (क्र. ४०३) यांनी ७७ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. पोहेकॉ. विष्णू भिल (क्र. २७०) आणि रुपेशकुमार तोडकर यांनी ७४ गुणांसह द्वितीय क्रमांक, तर नापोकॉ. कल्पेश आमोदकर (क्र. ३३०२५) यांनी ७३ गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. याशिवाय, १६ पोलीस अंमलदारांनी ६० हून अधिक गुण प्राप्त केले.या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे १,००० रुपये, ७०० रुपये आणि ५०० रुपये रोख बक्षीस देण्याची शिफारस करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या हस्ते गुणवंतांचा सन्मान करण्यात येणार आहे.या उपक्रमामुळे पोलीस अंमलदारांचे कायदेशीर ज्ञान वाढण्यास मदत झाली असून, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात त्यांचा आत्मविश्वासही वृद्धिंगत झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.